Sign In New user? Start here.

दिवाळीतील प्रत्येक दिवसाच महत्व

 

-: दिवाळी ची खास माहिती :-

दिवाळी मध्ये भाऊबीज, वसुबारस, पाडवा असा प्रत्येक दिवस आपण साजरा करोत असतो. पण प्रत्येक दिवसाच महत्व आपल्याला माहितीच असते असे नाही. खास तुमच्यासाठी हि माहिती जाणून घ्या दिवाळीतील प्रत्येक दिवसाच महत्व..

 

-: वसुबारस (आश्विन वद्य द्वादशी / गोवत्सद्वादशी) :-

आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणावरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून र्चांयाच्या फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाइला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरूवात करतात. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात. धनत्रयोदशी आश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो.धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपला पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्नी त्याला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परुपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या जगात (यमलोकात) परततो. अश्या प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतो. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यु टळतो असा समज आहे. धनत्रयोदशी बद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे समुद्र मंथन. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातुन देवी लक्ष्मी प्रगट झाली. तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पुजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे (देवांचा वैद्य) पूजन करतात. प्रसादास कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ति अमृतापासून झाली आहे. धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने जर रोज खाल्ली तर व्याधि होण्याचा संभव नाही. एवढे कडुनिंबाचे महत्त्व आहे. म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो
 
 

-: नरक चतुर्दशी :-

हा दिवाळीच्या दिवसांतील एक आहे. दर वर्षातील आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी येते. आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो. नरकचतुर्दशीच्या दिवशी लक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल. नरकचतुर्दशीच्य ा दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान केले जाते. आख्यायिका नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित नरकासुरवधाची आख्यायिका प्रचलित आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलमी राजवटीतून सोडवले. नरकासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व अवध्यत्वाचा म्हणजेच कुणाकडूनही वध होणार नाही असा वर मागून घेतला. त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले. नरकासुराने अश्या एकूण १६,१०० स्त्रियांना पळवून नेले व मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले. त्याने अगणित संपत्ती लुटली व अश्याच हावेपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छ्त्रही बळकावले. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, गंधर्व व मानवांना तापदायक झाला होता. अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्राग्ज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होती. ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी अग्नी, पाणी इत्यादींनी वेढलेली होती. या दुर्जय राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली. कृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला. नरकासुरवधाने देवादिकांना, तसेच प्रजेला आनंद झाला. नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत, हे जाणून कृष्णाने या १६,१०० कन्यांसोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून नरक चतुर्दशी साजरी करतात.
 
 

-: लक्ष्मीपूजन :-

आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो. या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. या दिवशी बळी पाताळात गाडला गेला, सर्व देवतांची सुटका झाली व लक्ष्मीचे वर्चस्व अबाधित झाले याची आठवण म्हणून यादिवशी लक्ष्मीपूजन करतात. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदुळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात. कृष्णाने नरकासुराचा वध केला तेव्हापासून नरकचतुर्दशी साजरी करतात. यासाठी धार्मिक कृती करतात. बलिप्रतिपदा बळी राजाचा नाश झाल्याचे प्रतीक आहे. तर भाऊबीज ही शकटासुर या असुराचा नाश करून असंख्य भगिनींना त्यांचा बंधु कृष्ण याने सोडवल्याचा आनंद म्हणून साजरी करतात. अशा तर्‍हेने दीपावलीचा प्रत्येक दिवस हा असुरांचा संहार केल्याच्या, धर्माने अधर्मावर विजय मिळवल्याच्या दिवसाची आठवण म्हणून मंगलमय दीपांनी उजळवायचा, असं आपली संस्कृती सांगते..
 
 

-: भाऊबीज :-

या दिवशी यमराजाची बहीण यमुना हिने आपल्या भावाला म्हणजेच यमराजाला अगत्यपूर्वक जेवायला बोलावले होते अशी पौराणिक कथा आहे. म्हणून भाऊबीज हा सण साजरा केला जातो. भाऊ बहिणीकडून ऒवाळून घेतो. भाऊ तिला प्रेमाचे प्रतिक म्हणून काहीतरी भेटवस्तू किंवा पैसे देतो. जर काही कारणाने बहिणीला कोणी भाऊ भेटलाच नाही तर ती चंद्राला भाऊ समजून ऒवाळते. भावा-बहिणीने एकमेकांची आठवण ठेवावी, विचारपूस करावी, एकमेकांवर प्रेम करावे यासाठी हा सण साजरा करतात. दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी… आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं… दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!