Sign In New user? Start here.

हमीदाबाईची कोठी

 
 

हमीदाबाईची कोठी

नेहरू सेंटर च्या 20 व्या राष्ट्रीय नाट्य महोत्सवामध्ये, 20 सप्टेंबर 2016 रोजी, संगीत हमीदाबाईची कोठी या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. या प्रयोगाला श्री.लताफत काझी यांचे मार्गदर्शन होतं. या पूर्वी या नाटकाचे दिग्दर्शन विजया मेहता ह्यांनी यशश्वी पणे केले होते. नाना पाटेकर, अशोक सराफ, भारती आचरेकर , नीना कुलकर्णी ह्या सारख्या दिग्गज कलाकारांनी गाजवलेले हे नाटक. पण 40 वर्षानंतर ह्या नाटकाचा पुनरुजीवन करताना दिग्दर्शकीय अंगाने प्रमोद पवार ह्यांनी वेगळा विचार मांडला आहे. आत्ताच्या प्रेक्षकांना कोठी आणि त्यावर चालणारे नाच-गाणे ह्याचा फक्त ऐकीव परिचय आहे. तो प्रत्यक्ष दाखवून पुढे नाटक सादर केल्यामुळे प्रेक्षकांपर्यंत ह्या नाटकातली वेदना जास्त तीव्र पणे पोहोचते.

ह्या नाटकामध्ये आपल्या तत्वांसाठी, निष्ठेसाठी कुठलीही तडजोड न करता आयुष्य वेचणाऱ्या हमीदाबाईची आणि तिच्या मुलीची कथा चित्रित केलेली आहे. अनेक दिग्गजांनी केलेल्या या नाटकाचे नव्याने सादरीकरण करताना प्रत्यक्ष गायक कलावंत आणि वादक कलावंत घेऊन संगीत नाटक म्हणून सादर केलेले आहे.

आजच्या कलाकारांपुढे नाटक, सिनेमा, मालिका अशी वेवधानं असताना सच्च्या कलाकाराची आपल्या कलेवरील निष्ठा ह्याची वानवा दिसते. समाजात हरवत चाललेली मूल्ये या विषयी अतिशय महत्वाची भूमिका मांडणारे हे नाटक, 40 वर्ष जुने जरी असले तरी आजच्या काळात हे अतिशय महत्वाचे ठरते.

आपल्या संगीतावरील निष्ठेशी एक रूप राहणारी हमीदाबाई आजू बाजूच्या बदलत्या वातावरणात स्वतःच्या मूल्यांशी तडजोड न करता, फिल्मची नाच गाणी आपल्या कोठीवर होऊ देत नाही. आपल्या सारखे आयुष्य आपल्या मुलीच्या वाट्याला येऊ नये म्हणून लहानपणा पासून हासटेल वर ठेवलेली शब्बो अचानक कोठी वर येते आणि सुरु होते एक विदारक गोष्ट... हमीदाबाईचं नेमका काय होतं?? लहानपणापासून मुसलमान असूनही संकष्टी पाळणारी शब्बो वेश्या वस्तीत आल्यावर कशी जगू शकेल ? पूर्वी ज्या ठिकाणी सुरांची पूजा व्हायची तिथे आज शरीराचा व्यापार करणारे, निष्ठेने काम करणाऱ्या सच्च्या कलाकाराला जगू देतील?...ह्या आणि अश्या अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी हे नाटक पाहणे महत्वाचे आहे...

हमीदाबाईची कोठी

रविवारी दि. ०९/१०/२०१६

<

वेळ : रात्री ९.३० वा.

स्थळ : भारत नाट्य मंदिर, पुणे

----------