जगाला गुलाम करू पाहणारा अलेक्झांडरी ‘दी ग्रेट’
जगाला गुलाम करू पाहणारा अलेक्झांडरी ‘दी ग्रेट’
(1)

   जगाला आदर्श अशी राज्य व्यवस्था घालून देण्यासाठी प्लेटो ज्या काळात धडपडत होता त्याच काळात ग्रीस शहरे रक्ताचे सडे शिंपणारी रणांगणे बनलेली होती. तिथे युद्धाला कोणतेही ठोस असे निमित्त लागत नसे. परस्पर द्वेष आणि परस्पर संशय यानी ही सर्व ग्रीक शहरे परस्परांविरुद्ध लढत होती. अथेन्स विरुद्ध कॉरिन्थ, कॉरिन्थविरुद्ध थीब्स, थिब्स विरुद्ध स्पार्टा व स्पार्टाविरुद्ध अथेन्स असा हा युद्धाचा चक्रव्यूह माजला होता. द्वेष, मत्सराच्या या चक्रव्यूहात सर्वच आपापल्या परी भर घालीत होते. सगळा जंगलीपणा होता. पाशवी आचरणालाच ती शौर्य मानीत होती. पण त्यांचं आक्रमण म्हणजे आकाशातून अकस्मात एकादा घन गंभीर विजेचा लोळ तुटून पडावा असाच सारा प्रकार होता. त्यांच्या दृष्टीने युद्ध ही नित्याची मामुली बाब होती. ते शरीरसामर्थ्याचे पूजक होते. पण त्या सर्व प्रकारांतून शौर्यशाली आणि उत्तमोत्तम माणसे रणांगणावर धारातीर्थी पडत होती आणि ग्रीक संस्कृतीच्या नष्टचर्याची वाट मळली जात होती, रक्ताच्या ह्या सड्यांतून. हा धोका ओळखून चिताक्रांत होणारे काही मुत्सद्दी ग्रीक समाजात होते ते आपल्या परीने तो टळावा यासाठी प्रयत्नशील होते पण रणकंदनाच्या धामधूमीत त्यांचा आवाज कोणालाही ऐकू न येण्याइतका क्षीण होता. कारण ते प्रवाहाविरुद्ध पोहणारे वेडेपीर होते. जगातल्या सर्वच प्रेषितांची अवस्था अशीच काहीशी होती. ग्रीसमध्ये अशाच ‘वेड्यापीरा’त आयसॉकेटिस हा एक होता.

   पारस्परिक युद्धाचा हा रक्तरंजि ज्वर थांबावा म्हणून आयसॉकेटिसनने ग्रीसचे एक संयुक्त संस्थान बनवावे असा तोडगा काढला. तो मात्र सर्वांनाच पसंत पडला. त्याची जबाबदारी मॅसोडोनियाचा राजा फिलीप्स याच्यावर सोपविण्यात आली. मॅसोडोनिया म्हणजे ग्रीसचा उत्तर भाग. ग्रीसच्या इतर टापूंपेक्षा हा भाग रानटी स्वरुपाचा व रानटी वृत्तीचा होता. आयसॉकेटिसच्या या तोडग्याबाबत जे आकर्षण निर्माण झाले त्याचे मुख्य कारण होते हा रक्तरंजित युद्धज्वर थांबावा अशी अनुभवांती निर्माण झालेली मनोधारणा. मात्र या तोडग्याच्या प्रत्यक्षातील अवलंबासाठी ज्याच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली राजा फिलीप्स हा चुकीचा माणूस होता. फिलीप्सने मॅसिडोनियन योद्ध्यांची एक सेना उभारलेली होतीच. तिच्या साह्यानं त्यानं हे ऐक्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दीर्घकाळ युद्धांमुळे कंटाळलेल्या ग्रीकांना शांततेच्या काळाची आवश्यकता भासावी हे अगदी स्वाभाविक होते. राजा फिलीप्सनं सैन्यबळावर युद्धाच्याच मार्गाने चालविलेल्या प्रयत्नाला त्यांनी निकराने तोंड दिले नाही. पण त्यातून निर्माण झालेले ऐक्य हे जितांचे ऐक्य होते, गुलामांचे ऐक्य होते. राजा फिलीप याच्या नेतृत्वाखाली एका संयुक्त गुलाम राष्ट्रानं जन्म घेतला.

AddThis Social Bookmark Button