कौटिल्य अर्थशास्त्र आणि आधुनिक व्यवस्थापन- आर्य चाणक्याचे सार्वकालिक `अर्थशास्त्र' - आर्य चाणक्याचे सार्वकालिक `अर्थशास्त्र'
कौटिल्य अर्थशास्त्र आणि आधुनिक व्यवस्थापन- आर्य चाणक्याचे सार्वकालिक `अर्थशास्त्र' - आर्य चाणक्याचे सार्वकालिक `अर्थशास्त्र'
Untitled Document
कौटिल्य अर्थशास्त्र आणि आधुनिक व्यवस्थापन
(1)

   आर्य चाणक्याचे सार्वकालिक
`अर्थशास्त्र'

(उपोद्घात)

   प्राचीन काळातील इतिहासाचा शोध घेताना तत्कालीन भूगोलाचाही समांतर विचार करावा लागतो. त्याविना त्याकाळातील इतिहासाच्या कोणत्याही अंगाचा विचार हा केवळ दुबळाच नव्हे तर अपूर्णही ठरतो. म्हणून त्यातला बोध हा दोषास्पद ठरतो. इतिहासावर आपल्या वैचारिकतेचे अथवा भावनिकतेचे कलम करणे हे तर प्रदूषणच ठरते.भूगोलाचा इतिहासावर जो प्रभाव पडतो तो भौतिक, सामाजिक आणि आर्थिक स्वरूपाचा असतो. म्हणूनच आर्य चाणक्य किंवा कौटिल्य यांच्या द्रष्टेपणाने नंद वंशाचा झालेला निपात आणि मौर्य वंशाचा झालेला वैभवशाली उदय ज्यायोगे होऊ शकला त्या कौटिल्य अर्थशास्त्राचे आज जगात सर्वत्र काही अंशी पुनर्विलोकन चालू आहे.

  कौटिल्याने राज-कर्तव्यासंबंधी दोन ग्रंथ लिहिले. एक अर्थशास्त्र आणि दुसरा कौटिल्यनीती.

  नंदाच्या सुस्थापित राजसभेत आर्य चाणक्याचा जो अपमान झाला तो जिव्हारी लागल्याने त्याने नंदापासून फारकत घेतली आणि नंदाचा वंशविच्छेद करून सूड उगविण्याची प्रतिज्ञा केली. व चंद्रगुप्ताच्या साह्याने ती पूर्ण करून घेतली अशी सर्वसाधारण माहिती आपल्याला असते. `अर्थशास्त्र' या शब्दाने आपणापुढे जो अर्थ उभा राहतो तो formal Economics यापेक्षा वेगळा नसतो. परंतु व्यास महर्षींच्या बाबतीत आपण `व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम' असे ज्या अर्थाने अथवा व्यापकतेने वापरतो त्यापेक्षा एक पायरी पुढे जाऊन कौटिल्याच्या अर्थशास्त्राचा विचार करावा लागावा अशा सार्वजनिक द्रष्टेपणाचा बौद्धिक आवाका आर्य चाणक्याच्या ठायी असावा हेच सिद्ध होते.

   जगाच्या अतिप्राचीन इतिहासात जेव्हा युरोप खंड दाट अंधारात चाचपडत होता त्यावेळी भारताची अथवा आर्यारथाची ही भूमी प्रकाशाने लख्ख उजळलेली होती. काळाच्या इतिहासात आपल्याला `एपिक एज' किंवा महाकाव्यांचा काळ म्हणजे ख्रिस्तपूर्व 5 ते 7 हजार वर्षांपासूनच्या काळापासून शिकविला जातो. कोणतेही ज्ञान हे सैद्धांतिक स्वरूपात येण्यासाठी त्यामागे प्रदीर्घ काळाची प्रक्रिया कार्यरत असते आणि या प्रक्रियेचे कर्ते-करविते होते आपले तत्कालीन ऋषी-मुनी आणि त्यांची शिष्य परंपरा. म्हणूनच `भारतवर्ष' हे भारताचे जुने नाव होते त्यातल्या `भारत' या शब्दातच तत्कालीन जगाच्या तुलनेत या प्रदेशाला भा = प्रकाश + रत = मग्न अशा नावाने गौरवास्पदता लाभली. वर्त, वर्ष असे शब्द त्याकाळी `प्रदेश' या अर्थाने वापरले जात असावेत. महाकाव्याचा काळ हा नेमका केव्हा सुरू झाला याचेच विवेचन पाश्चात्य इतिहासकारांनी वा विद्वानांनी ऐहिक दृष्टिकोनातून केलेले असले तरी `रामायण' या पहिल्या महाकाव्याच्या रचनेची प्रेरणा वाल्मिकी ऋषींना `मा निषाद प्रतिष्ठांत्वाम्' या निषेधाच्या उद्गारातून झाली. ते उद्गार पाणिनीकृत संस्कृतावर आधारलेले आहेत. याचाच अर्थ इतकाच की, त्या चार ओळींची सहवेदनात्मक उद्गारापूर्वीच संस्कृत भाषेची शास्त्रशुद्ध पद्धतीवर पुनर्रचना झालेली होती. ज्ञान आणि काळ हे कधीच स्थिरवादी अथवा `इनर्शिया'त गुरफटलेले नसतात. प्रवाहित्व आणि विस्तार हे त्यांच् समान सहज धर्म असतात. त्या प्राचीनतम काळातील ऋषीमुनीनी जगातल्या सर्वच ज्ञान- शाखांना सैद्धांतिक स्वरूप दिले. `सिद्धांत' हा ज्ञानाच्या विस्ताराच्या संदर्भात End product of the IQ of the longterm integrated knowledge असे म्हणता येईल. पूर्वीच्या राजेरजवाड्यांच्या पदरी विविध श्रेत्रातील विद्वज्जन सल्लागार म्हणून असत आणि त्यांच्या बरोबरची सल्लामसलत ही धोरणे ठरविण्याचा महत्त्वाचा भाग असत. आर्य चाणक्य हा नंदाचा असाच एक सल्लागार होता. व्यवस्थापन शास्त्राच्या इतिहासाचा मागोवा आपण घेतो त्यावेळी आजच्या पिढ्या 1950च्या दशकात शोधाशोध करताना दिसतात. या दशकात व्यवस्थापनाला `शास्त्र' म्हणून मान्यता मिळालेली आढळते आणि त्याचा जनक पीटर ड्रकर हा मानला जातो. पण त्यापूर्वीच्या काळात भारताचा ज्ञानोदय 7000 वर्षांचा मानला तर या त्या काळात व्यवस्थापन नावाची चीज आपल्या देशात अस्तित्वात नव्हती का? असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. या प्रश्नाचा शोध घेताना प्राचीन उपलब्ध ग्रंथाच्या आधारे व्यवस्थापनासंबंधीची अलीबाबाची गुहा आपणापुढे उघडी होते. रामायण काय किंवा महाभारत काय अथवा आपली उपनिषदे काय, या सर्वात व्यवस्थापनाच्या विविध धोरणांची मागोवा लागतो. हजारो शतकांच्या राजकीय गुलामगिरीचा जो प्रभाव आमच्या मानसिक जडणघडणीत बेमालूम मिसळला गेला आहे त्यामुळे आपण फक्त चूक काय हाच विचार करू शकतो. (मला वाटतं, `वादे वादे जायते तत्त्वबोधा' याचाच हा विपर्यास असावा.) पण `आमचे मोठेपण कशात आहे?' या प्रश्नाचा विचार करण्याची आमच्या तथाकथित विद्वजनांची `नजरबंदी' झालेली असावी! `राष्ट्र' या संकल्पनेच्या अनुषंगाने आपण काळाची परीक्षा उत्तीर्ण झालो आहेत, आपली अर्थव्यवस्था विकसनशील आहे आणि अपयशी ठरलेले राष्ट्र ही आपली संभावना होऊ शकत नाही. आपला देश एका काळी यशाच्या शिखरावर आरूढ झालेला होता; जगातले किती देश स्वतसंबंधी अशी प्रौढी सांगू शकतील? आजच्या प्रागतिकवाद हा देशाच्या सीमांबाहेर डोकावण्यात धन्यता मानीत आहे. `आत' डोकावतांना फारसे कोणी दिसत नाही, हाच आमचा कच्चेपणा आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे आमच्या शिक्षण व्यवस्थेचे झालेले पाश्चात्यीकरण होय! आपल्यापैकी असख्यांनी `कौटिल्य अर्थशास्त्र' ही संज्ञा ऐकलेली असेल. पण त्यापैकी किती जणांनी ते प्रत्यक्ष समजून घेण्याचे कष्ट घेतले असतील? वास्तविक आपले प्राचीन वाङ्मय हा आपण कोण होतो हे दाखविणारा आरसा आहे. पण कौटिल्याचे अर्थशास्त्र सूडबुद्धीच्या पार्श्वभूमीवर जन्मलेले असले तरी त्यातला समग्र प्रवास हा निर्दोष सकारात्मकतेचा विधायक आहे, कारण विधायकता ही त्याची आधारशीला आहे. आर्य चाणक्य अथवा कौटिल्य म्हणून आपण ज्याचा उल्लेख करतो तो होता तरी कोण ही जिज्ञासा स्वाभाविक आहे. ख्रिस्ताब्द तिसऱया शतकात नंबुदरी ब्राह्मण कुळात जन्मलेला तो एक अतमयंत कुरूप पण अत्यंत तल्लख बुद्धीचा होता तो. त्याचे नाव विष्णुगुप्त अथवा कौटिल्य. प्रत्येक घटनेच्या पाठी जसा दीर्घकालीन अथवा अल्पकालीन कार्यकारण भाव असतो तसाच एक कारणात्मक भावही असतो. तोच प्रत्येक कृतीचे मूल्यमापन ठरवितो (पूर्वग्रहरहित). तल्लख बुद्धी आणि जिज्ञासू वृत्ती यांचा सुरेख मेळ जमल्याने राजसल्लागार म्हणून जे जे अनुभव त्याला आले त्यांचा व्यवहार्य मागोवा घेत राहिल्याने त्याचे हे `अर्थशास्त्र' केवळ अर्थशास्त्रापुरतेच मर्यादित न राहता अर्थशास्त्राबरोबर राजकारण, कायदा, नेतृत्व, व्यवस्थापन, शासन, युद्धशास्त्र, लष्करी डावपेच, हिशेब पद्धत आदी राजशासनाला व्यवहारोपयोगी अशा अनेक गोष्टींचे शास्त्रीय विवएटन त्यात आढळते आणि त्या ज्ञानापुढे चंद्रगुप्त मौर्याच्या साम्राज्याचा इतिहासही खुजा वाटू लागतो. आमच्या बोलक्या बृहस्पतीचा एक स्वाभाविक दोष म्हणजे अविश्वासू वृत्ती. एकाद्या गोष्टीचा काथ्याकूट करीत वाद माजविणे हे विद्वतेचे लक्षण आजही मानले जाते. याला विद्वता म्हणण्यापेक्षा `विद्वजडता' असेच म्हणावे लागेल. अर्थात आर्य चाणक्य अथवा कौटिल्यही यातून सुटला नाही. चाणक्य नावाची कोणी व्यक्तीच झाली नाही, ती फक्त काल्पनिक आहे आणि तिने लिहिलेले अर्थशास्त्र व नीतिशास्त्र हे दोन्ही ग्रंथ म्हणूनच काल्पनिक आहेत असा वाद काही काळ घुमलाच; पण तो खोटा असल्याचे सप्रमाण सिद्ध झाले आहे.

   `मुद्राराक्षस' नाटकाच्या आरंभी सिद्धार्थकाने चाणक्यनीतीचे वर्णन करताना म्हटले आहे-

  `बुद्धीजलणिज्झरें सिश्चन्ति देसआलकलसेंहि।

  दंसिस्सदि कज्जफलं गरुअं चाणक वणर्आदिलदा।।'

   (चाणक्यानी तीरूप लतेवर देशकालाच्या घटांनी बुद्धीजलाचे सिंचन केले असता, कार्यसिद्धी हे सुंदर फल प्राप्त होईल.)

AddThis Social Bookmark Button