जगाच्या इतिहासातील कूरकर्मा कॅटो
जगाच्या इतिहासातील कूरकर्मा कॅटो

   जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमधले जे काही अंतर प्रत्येक प्राणीमात्राच्या नशिबी येते त्याला आपण आयुष्य अथवा जीवन म्हणून उल्लेखतो. या जीवन रेषेकडे प्रत्येक जण कोणत्या भावनेने पाहतो त्यानुसार तो त्याला संबोधतो. कोणाला तो रमत गमत करायचा प्रवास वाटतो, त्यात गतिमानता असली म्हणजे कोणाला तो जीवनप्रवाह वाटतो. ज्यावेळी त्यात अनुकूल-प्रतिकूलतेची वारंवार द्वंद्व असतात, सुखदु:खांच्या टक्करीतून अग्रेसर व्हावं लागतं, त्यावेळी त्याला जीवन संघर्ष म्हणतात. जसा ज्याचा अनुभव तसं त्याचं स्वरूप वर्णन. प्रत्येक माणसाचं व्यक्तिमत्व हे `पिण्डे पिण्डे मर्तिर्भिन्ना' या स्वरुपाचं वेगवेगळं असतं. आदिमकाळी माणूस हा पशूंप्रमाणेच उदरभरण आणि स्वसंरक्षण इतकंच जीवन जगत होता. हा कालावधी लक्षावधी वर्षांचा असल्याने अनुवंशिकता म्हणून त्याच्या रक्तात आजही पाशवी अंश थोड्याफार प्रमाणावर भिनलेला असतोच. नैतिक आचरणाचे संस्कार त्याच्यावर किती प्रमाणावर झालेले असतात त्यावर या अंशाचं अस्तित्व अवलंबून असते.

   पण तरीही प्रत्येक व्यक्तीच्या ठायी माणूस आणि पशू या दोघांचंही अस्तित्व असतेच. ते टाळणे अथवा त्या पशूवर मात करणे महा कठीण कर्म असते. वयोवृद्ध हतबल आणि अगतिक हॅनिबालची शोकांतिका आपण लक्षवेधीपणाने पाहिली पण त्याच्या आत्मनाशाने रोमनांच्या सूडबुद्धीची तृष्णा शमलेली नव्हती. रोमनांची सूडबुद्धी इतकी पराकोटीला जाऊन पोहोचली होती की, कार्थेजचा नायनाट करण्यानेच ती शमणार होती असे इतिहासाचा मागोवा घेता म्हणता येते. रोमनांच्या या हाडवैराने नखशिखान्त लडबडलेला पुतळा म्हणजे रोममध्ये सार्वजनिक नीतीचे नियंत्रण करणारा मंत्री मार्पस पोर्सियक्ष कॅटो हा होय. एखाद्या विशिष्ट गुण दोषाचा ज्याच्या ठायी अतिरेक असतो त्याच दृश्यात्मक स्वरूप त्याच्या नुसत्या व्यक्तिमत्त्वात नव्हे तर त्याच्या व्यक्ती स्वरूपातही साकारत असा एक अलिकडच्या शरीर शास्त्रज्ञांच्या निष्कर्ष आहे. निदान कॅटोच्या बाबतीत तरी तो शंभर टक्के खरा होता असेच म्हणावे लागेल. अशा सर्व द्वेष, मत्सर, सूडबुद्धी आणि कूरता यांचा पुतळा असलेला कॅटो याचं विनवुड रीड यानं जे वर्णन नोंदवून ठेवले आहे ते असे- ``कॅटो हा एक आवाढव्य माणूस होता. त्याचे डोळे मांजरासारखे हिरवे-करडे होते. केस कोह्याच्या केसांसारखे होते. दात इतके मोठे होते की, ते जणू हत्तीचे सुळेच वाटत.

  त्याचा चेहरा अति कुरूप व भीषण होता. त्याचं तोंड पाहावं असं कोणासही वाटत नसे. त्याच्या भीषण कुरुपतेचे वर्णन करणारी अनेक काव्य रचली गेली होती. एका तर काव्यात म्हटले होते, यमाची नरकपुरीही कॅटोला आत घेण्यास धजत नसल्याने त्याला तेथील वैतरणेच्या तीरावरच भटकत फिरत राहाव लागेल.'' काही माणसे विघ्नसंतोषी असतात. दुसऱयाचे भले झालेले त्यांना कधीच पाहवत नाही; दुसऱयाचे जितके वाईट होईल त्यात त्यांना आनंद वाटत असतो. कॅटो याच श्रेणीतला अर्प होता. रोमन प्रजाही त्याला आणि त्याच्या या कुरूप दुष्टपणाला कंटाळली होती. सतत युद्धाचे वातावरण हीच त्याची रोमला देणगी होती. रोमच्या जनतेला उसंतीची, विसाव्याच्या जीवनाची आवश्यकता होती. ग्रीक हे मूलत: सौंदर्योपासक. त्या सौंदर्योपासनेचा थोडासा आस्वाद घ्यावा असे त्यांना वाटत होतंच. पण कॅटोला ते मान्य नव्हते. ग्रीक तत्त्वज्ञान, सौंदर्योपासना व कलापूजा यांचा तो पूर्णत: द्वेष्टा होता. ग्रीक तत्त्वज्ञानांना त्यांनी हद्दपार केले. ग्रीक पुस्तकांवर बंदी बसवली आणि पोरकट ग्रीकांचे कुणीही अनुकरण करू नये अशा हुकूम जारी केला होता. ग्रीक कला आणि करमणुकीची ग्रीक साधने अश्लिल आहते असे त्याचे प्रतिपादन असे. सत्ताधारी बनल्यापासून जीवन म्हणजे मरणयात्रा स्मशानयात्राच त्याने बनविली. स्पार्टन लोकांच्या आडदांड जीवनाचा तो उपासक होता. सर्व रोमनांना स्पार्टन जीवन पद्धत व शिस्त शिकवावी याचा तो पुरस्कार करी. स्पार्टन क्रौर्य आणि निर्दयता यांचा तो चाहता होता. त्यांचे गुणावगुण त्याच्याठायी पराकाष्ठेने होते. सर्व रोम म्हणजे एक लष्करी छावणी व्हावी यासाठी त्याची सर्व धडपड असे. शत्रू पक्षाकडील लोकांना त्यांच्या बायकामुलांना जितक्या अधिक संख्येत मारता येईल तितके मारावे हा त्याचा ध्यास होता.

AddThis Social Bookmark Button
 

Add comment