काल..
न्यूयार्क शहराच्या मध्यावर ते हॉटेल होतं. टोलेजंग इमारतीचं. दरवाज्यात बेलबॉय कडक पोशाखात उभे होते. राजदुतांनी लिमोसीन पोर्चमध्ये थांबताच एक जण दरवाजा उघडायला अदबीने पुढे आला. तोवर दुस-याने पलीकडून सामान ताब्यात घेतले. राजदूत हॉटेलमध्ये आले. समोरच संगमरवरी लॉबीमध्ये दहा हत्तींच्या सोंडेतून कारंजं धरलेलं होतं. कोप-यात एक खरंखुर पन्नास फुटी पाम ट्री होतं. मे महिन्यातील भर दुपार असतांनादेखील, झुंबरांची योजना छतामधील स्कायलाईटला पूरक ठरेल अशीच केली होती. कुठुनसे मोझार्टचे मंद सुर येत होते. "सिंफनी वॅन एट उन - इट्स ऑल अबाऊट आमूर...", राजदुतांच्या मनात आलं. इतक्यात एक परिचारीका कातडी बांधणीमध्ये कागदपत्र घेऊन पुढे आली आणि राजदुतांकडे देत त्यांना लिफ्टपाशी घेऊन गेली. त्यातील अमेरीकन प्रेसिडेंन्ट्ची स्वाक्षरी असलेलं ग्रिटीन्ग कार्ड वाचत राजदूत त्या चकचकीत काचेच्या लिफ्टमध्ये शिरलें आणि काही सेकंदातच चोपन्नाव्या मजल्यावरच्या आपल्या पेन्टहाऊसमध्ये पोहोचले. पेन्टहाऊस मध्ये शिरताच सिटिंग रुम, आतल्या बाजूला मास्टर बेडरुम, फ्रीज-मायक्रोव्हेसहित किचन, सुमारे दहाबारा माणसे बसू शकतील एवढी आणि सेक्यूअर ऑडिओ/व्हिडिओ लाईनने अद्ययावत असलेली कॉन्फरन्स रुम, एक स्वतंत्र खोली वाटावी इतकी प्रशस्त बाथरुम - ती पुन्हा संगमरवरी साजात मढलेली. राजदूतांनी किचनमधील फ्रीज उघडला. आतमध्ये त्यांची आवडती शॅम्पेन आधीच कुणीतरी थंड करीत ठेवली होती. "वर्थ एव्हरी पेनी ऑफ थ्री थाऊजन्ड डॉलर्स फॉर ए नाईट" - राजदुतांच्या चेह-यावर पहिल्यांदा स्मित झळकलं...
आज...
काल रात्री काय छान खाना झाला होता. बडा मझा आया. "पुढल्या वर्षीच्या जनरल इलेक्शनमध्ये तुम्हीच राष्ट्राध्यक्ष होणार" निमंत्रितांपैकी आलेला जवळपास प्रत्येक जण सांगत होता. आणि खरंच होतं ते. गेली छत्तीस वर्ष राजदूत राजकारणामध्ये होते. त्यापैकी गेली आठ वर्ष जगाची विकळीत झालेली आर्थिक घडी परत नीट बसवण्यामध्ये गेली होती. "तो कोण ग्रीसचा अथमंत्री माझ्या बुटांवर सांडलेली वाईन पुसायला वाकला होता सगळ्यांसमोर. ईटालियन आहेत. खराब होतील म्हणे. सिली बॉय -" राजदूतांनी आपला नाईटगाऊन फडला आणि जकुझीमधील साबणाच्या फसात पाय घातला. संध्याकाळी न्यूयॉक ते पॅरीस विमान होतं. बाजूलाच असलेल्या आयपॉडवर इडिथ पियाफचं गाणं सुरु झालं. पुन्हा एकदा राजदूत युरोपच्या विचारांमध्ये गढून गेले. पुढल्या आठवड्यात जर्मन चान्सलरबरोबर कॉन्फरन्स आहे , मग लंडनला जागितक अर्थपरिषद, आणि हो - अमेरिकेत परतण्याअगोदर व्हॅटिकनला पोपबरोबर एक खाजगी मिटींग. या रिलीजस लोकांचीदेखील एकदा एक मोट बांधली पाहिजे.
गार्डेनिआचा बाथ घेऊन फ्रेश झालेले राजदूत टर्कीश टॉवेल बांधून बाहेर आले. समोरच सिटींग रुम मध्ये हॉटेलची एक सदनसेविका सोफ्याचं कव्हर बदलण्यात मग्न झाली होती. तोकड्या राखाडी गणवेषामधील ओणव्या असलेल्या त्या स्त्रीकडे राजदूतांचं लक्ष गेलं. आणि - आणि पुढे फक्त तिची एक आणि त्यांची एक अशा दोन वेगवेगळ्या कहाण्या मागे राहिल्या...
पॅरीसचं विमान चुकलं म्हणून राजदूत घाईघाईने आपलं सामान न घेताच हॉटेलमधून निघून गेले. विमान सुरु व्हायच्या काही क्षण अगोदर पोलिसांनी त्यांना गाठलं. राजदूत विमानाबाहेर आले. पॅरीसचं विमान राजदूतानशिवायचं पॅरिसला निघून गेलं. इथे बलात्काराच्या आरोपाखाली राजदूतांना न्यूयॉ्र्कच्या सरकारी तुरुंगामध्ये हलिवण्यात आलं. पोलिसांची गाडी तुरुंगाच्या
आवारामध्ये येताच राजदूतांच्या हातांमध्ये बेड्या ठोकल्या गेल्या. दोन पोलिसांनी दोन बाह्यांना धरुन राजदूतांना बाहेर काढले. सुमारे चौदा हजार आरोपी राहत असलेल्या कारागृहामध्ये राजदूत आले. त्या अंधा-या, दगडी इमारतीत आत शिरताच वाडर्नने प्रथम त्यांचे कपडे काढून घेऊन तुरुंगातील कपडे घालायला दिले. उंची अमार्नी सूटाच्या ठिकाणी पट्यापट्यांचा शर्ट आणि
लेंगा आला. इटालियन बुटांच्या जागी तुरुंगातील सपाता आल्या. खाकी लिफाफ्यातील पिवळ्या कागदावर "आपल्याला या वस्तू अमेरिकन सरकारकडू न मिळाल्या आशयाच्या मजकुराखाली सही झाली. राजदूतांची रवानगी आता एका बराकीत करण्यात आली. ती बराक दहा बाय बारा ची होती. एका भिंतीशी एक लोखंडी खाट, आणि दुस-या बाजूला एक उघडे स्टेनलेस स्टीलचे कमोड. बस्स! आतमध्ये एवढीच सामग्री होती. बाहेर गस्त घालणा-या पहारे- क-याची, "लाईट्स आऊट" गजाल ऐकू आली. राजदूतांनी डोळे मिटून घेतले. कधीतरी लहानपणी कानावर आलेल्या एका इन्डियन फोकटेलवर कुणा महाभागाने रचलेल्या दुनोळ्या आठवल्या. अर्थ काहीसा होता.
मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते सर्व राज्य बुडाले...