Alandichi Wari
Savai Gandharv

   आळंदीची वारी

   मागील वर्षीप्रमाणेच यंदा कार्तिक महिन्यात लागोपाठ दोन एकादश्‍या (ता. 1 व ता. 2) आल्याने कार्तिकी वारीत वारकऱ्यांचा माउलींच्या समाधी दिनाबाबत गोंधळ होण्याची शक्‍यता आहे. यामुळे आळंदीत भरणाऱ्या कार्तिकी वारी सोहळ्यात यंदा कार्तिकी एकादशीचा उपवास डिसेंबरमध्ये गुरुवारी (ता. 2), तर संत ज्ञानेश्‍वर महाराजांचा 714 वा संजीवन समाधी दिनानिमित्तचा सोहळा कार्तिक वद्य त्रयोदशीला शनिवारी (ता. 4) साजरा करावा, असे आवाहन सोहळ्यात सामील होणाऱ्या तमाम वारकऱ्यांना दिंडीकरी संघटनेचे सचिव मारुती कोकाटे आणि राजाभाऊ चोपदार यांनी केले आहे.

कार्तिकी यात्रेच्या आनंद सोहळ्यात सुमारे चार लाखांहून अधिक भाविक

   पंढरपूर - कार्तिकी यात्रेच्या आनंद सोहळ्यात सुमारे चार लाखांहून अधिक वारकरी सहभागी झाले. लाखो वारकऱ्यांनी चंद्रभागेत स्नानाची पर्वणी साधण्यासाठी नदीच्या तिरावर गर्दी केली होती. टाळमृदंगाच्या ठेक्‍यावर वारकऱ्यांनी मोठ्या उत्साहात नगरप्रदक्षिणा केली. हरिनामाच्या जयघोषात तल्लीन झालेल्या वारकऱ्यांनी सारे रस्ते फुलून गेले होते. श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग गोपाळपूर नाक्‍याच्या समोरील पत्राशेडपर्यंत गेली असून दर्शनासाठी आज 17 तास लागत होते.

   "पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे, हेचि घडो मज जन्मोजन्मांतरी मागणी श्रीहरी नाही दुजे' या भावनेने राज्याच्या विविध भागातून तसेच कर्नाटकातून सुमारे चार लाखांहून अधिक भाविक येथे आले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत गर्दी कमी दिसत आहे. चंद्रभागेचे वाळवंट, श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग आदी भागातील मठ तसेच धर्मशाळांमधून कीर्तन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. आज सकाळपासून मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग आणि वाळवंटात जिकडे पहावे तिकडे हाती भगवी पताका, कपाळी गंध लावलेले वारकरीच दिसत होते.

   कार्तिकी एकादशीची पर्वणी साधण्यासाठी पहाटे चार वाजल्यापासूनच चंद्रभागेच्या तिरावर लाखो वारकऱ्यांनी गर्दी केली होती. पवित्र स्नान करून श्री पुंडलिकाचे दर्शन घेऊन वारकरी गडबडीने श्री विठ्ठलाच्या दर्शनाच्या रांगेकडे जात होते. यंदा दर्शनाची रांग अधिक लांब अंतरावर जाऊ नये यासाठी मंदिर समितीने दोन जादा तात्पुरती पत्राशेड उभा केली आहेत. त्याचा वारकऱ्यांना उपयोग होत आहे. शेडमधील सावलीत लोक उभा राहू शकत आहेत. दर्शनाची रांग आज देखील तेथील शेडमध्येच होती. तेथील चारही पत्राशेड वारकऱ्यांच्या गर्दीने भरून गेली होती.

   आज सकाळी दहा वाजता श्री विठ्ठल मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलेले अर्जुन लक्ष्मण कांबळे ( वय 36, रा.कासारी ता.कागल जि.कोल्हापूर), महादू पांडुरंग चौरगे (वय 69, रा.वरई जि.रायगड) यांना विचारले असता ते म्हणाले, ""मंगळवारी सायंकाळी पाच वाजता आपण रांगेत उभा राहिलो. तब्बल 17 तासांनी दर्शन झाले.''

   दुपारी परंपरेप्रमाणे श्री विठ्ठलाच्या रथयात्रेला येथील माहेश्‍वरी धर्मशाळेपासून उत्साहात प्रारंभ झाला. कालिकादेवी मंदिर, काळा मारुती, चौफाळा, नाथ चौक या मार्गावरून हा रथ पुन्हा माहेश्‍वरी धर्मशाळेजवळ आणण्यात आला. तिथे या सोहळ्याची सांगता झाली. हा रथयात्रेचा सोहळा पाहण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती

   कालच्या तुलनेत आज प्रासादिक वस्तू तसेच सोलापुरी चादरी, घोंगड्या, खेळणी, बांगड्या, चुडे खरेदीसाठी वारकऱ्यांची दुकानातून गर्दी दिसत होती. शहरात अनेक भागात घाण दिसू लागली असल्याने नगरपालिकेने शहरात वेगाने स्वच्छता मोहीम राबवण्याची गरज आहे. मंदिर परिसरातील लहान बोळातून तसेच प्रदक्षिणा मार्गाच्या भागात दुर्गंधी आहे.

Other Festivals link


AddThis Social Bookmark Button
 

Add comment