गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या...! अशा गर्जना देत एक वर्ष आराम करून झाल्यावर पुन्हा एकदा बाप्पाचे भक्त त्यांच्या आगमनाच्या तयारीला लागलेले दिसताहेत. श्रावण आला की पावसाच्या सरीबरोबरच आणखी एका गोष्टीची उत्सुकता लोकांना लागलेली असते ती म्हणजे गणेशोत्सवाची. काही दिवसांवर आलेल्या या उत्सवाची चाहूल लागताच विविध शहरातील मूर्तिकार भक्तांच्या लाडक्या विघ्नहर्त्याच्या मूर्त्यांवर शेवटाचा हात फिरवतांना दिसताहेत. येत्या १ सप्टेंबरला भक्तांच्या लाडक्या गणेशाचे आगमन होणार असून या पार्श्व्भूमीवर सगळीकडे गणेश उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे.
समाजाच्या एकोप्यासाठी लोकमान्य टिळकांनी पुण्यातून गणेश उत्सवाची सुरवात केली आणि आजही हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. कुठे हा उत्सव पाच दिवस, कुठे एक दिवस तर बहुतेक ठिकाणी दहा चालतो. दहा दिवसात गणेश मंडळे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात. दरवर्षी या उत्सवात विविध मंडळांच्या देखाव्यांमध्ये राष्ट्रीय घडामोडींचे प्रतिबिंब पहायला मिळते. त्यामुळे यावर्षी कोणत्या प्रकारचे देखावे पहायला मिळतील याकडे भक्तांचे लक्ष लागले आहे. शिवाय लहान मंडळांपासून ते मोठ्या मंडळांचे सदस्य वर्गणी गोळा करण्यात व्यस्त आहेत. गणेशोत्सव म्हटला की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी गोष्ट म्हणजे मोदक. त्यामुळे शहरातील विविध मिठाईच्या दुकानांमध्ये मोदकांचे थर सजायला लागले आहेत.
बाजारपेठेतील शोभेच्या वस्तुंची दुकाने तुडूंब भरलेली आहेत. गल्लो-गल्ली विविध गणेश मंडळांचे मंडप उभे झालेले दिसताहेत. आपल्या लाडक्या गणेशाला आणण्यासाठी रथ सजायला लागले आहेत. गल्लो गल्ली ढोल ताशांच्या तालमी जोर धरत आहेत. सगळीकडे कसं प्रसन्न वाटतंय आणि गणेशोत्सव आला आहे याची प्रचिती भक्तांच्या तयारीतून दिसून येत आहे. तर मग तुम्ही तयार आहात ना आपल्या लाडक्या गणेशाच्या स्वागतासाठी...?