गणपती माझा नाचत आला...
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या सर्वांच्याच लाडक्या गणरायाचे आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर ढगांच्या ढोलताशांसह वाजतगाजत मोठ्या जल्लोषात आगमन झाले. घराघरात, सार्वजनिक गणपतींच्या मंडपात गणराय आसनस्थ झाले. गणरायाच्या आगमनामुळे अख्ख्या महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ढोल-ताशे, लेझिम-झांजांचा दणदणाट आणि फटाक्यांच्या आतषबाजीत बुधवारी रात्रीपासूनच भगवान गणेश भाविकांच्या घरी येऊ लागले. गणपती बाप्पा मोरयाचा गजर करत लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी लाखो भाविकांनी काल रस्त्यावर गर्दी केली होती. भाविकांसोबतच गणरायाच्या स्वागतासाठी सकाळी पावसानेही हजेरी लावली होती.
यंदाच्या वर्षी मुंबईत जवळपास २ लाखाच्या आसपास गणेशमूर्ती स्थापन करण्यात आल्या असाव्यात. त्यामध्ये सुमारे १० हजार सार्वजनिक मंडळांचा तर सुमारे १ लाख ९० हजार घरगुती गणपतींचा समावेश आहे, अशी प्राथमिक आकडेवारी मुंबई महापालिकेच्या वतीने देण्यात आली. दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात कोणतेही विघ्न उद्भवू नये, यासाठी मुंबईच्या आणि महाराष्ट्रातील इतरही शहरातील रस्त्यारस्त्यांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.