गोविंदा आला रे आला.....!
Savai Gandharv

  "गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रीजबाला......!" ह्या गीताचे बोल आठवतात ते खास करून गोकुळ जन्माष्टमीला. गणेशोत्सवाच्या काही दिवस आधी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. भारतभर साज-या केल्या जाणा-या उत्सवाला अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातं. महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये हा उत्सव अतिशय धडाक्यात साजरा केला जातो. या उत्सवाचं खास आकर्षण म्हणजे दहीहंडी. येत्या २२ तारखेला गोकुळाष्ट्मी असून काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या या उत्सवासाठी दहीहंडी फोडणा-या गोविंदांची कसून तयारी सुरू झाली आहे.

   भगवान श्रीकृष्ण यांच्या जंयती निमित्ताने साजरा केला जाणारा हा उत्सव त्याच्या वेगळेपणामुळे अतिशय प्रसिद्ध आहे. इतर अनेक उत्सवांप्रमाणे याही उत्सवात हजारो लोक सहभागी होतात. या उत्सवाचं मुख्य आकर्षण म्हणजे दहीहंडी. भगवान श्रीकृष्ण हे माखनप्रेमी होते. त्यामुळे या उत्सवात एक दह्याने भरलेली हंडी काही फुटांवर बांधलेली असते आणि ती फोडण्यासाठी माणसांचे मनोरे तयार केले जातात. जे गोविंदा पथक ही दहीहंडी फोडतात त्या पथकाला लाखो रूपयांचे बक्षीसही दिलं जातं. मुंबईत आणि पुण्यात या दही-हड्यांची खुप जास्त क्रेझ दिसून येते. या शहरांच्या रस्तोरस्ती अनेक दहीहंड्या ठेवल्या जातात. संपूर्ण शहरातून आणि बाहेरगावाहून गोविंदांची पथके येतात आणि एकावर एक उभे राहत ती फोडण्याचा प्रयत्न करतात. डिजे आणि ढोल ताशांच्या आवाजात गोविंदांना अधिकच जोश येतो. दहीहंडी फोडण्याच्या प्रयत्नात अनेकांना दुखापत सुद्धा होते. पण त्यांच्यात देवाची भक्ती ऎवढी रूजलेली असते की, दुखापतीला न जुमानता ते दहीहंडी फोडण्याचा नादात असतात. महत्वाचं म्हणजे या पथकांमध्ये लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सहभाग घेतला जातो. या लहान मुलांना दहीहंडी फोडण्यासाठी सर्वात शेवटी वर चडविलं जातं. शिवाय वर चढलेल्यांपैकी कुणी खाली पडू नये यासाठी खाली अनेक लोकाचं जाळंही तयार केलं जातं. ज्यामुळे पडणा-याला कमी इजा होते.

   दहीहंडी फोडण्याच्या या उत्सवात आधी माणसेच सहभागी व्हायची मात्र आत्ता परिस्थिती बदलली असून अनेक मुलींची गोविंदा पथके तयार झाली आहेत आणि त्या मुली सुद्धा या माणसांच्याच ताकदीने दहीहंडी फोडण्यासाठी मनोरे तयार करतात. मुलींचे गोविंदा पथके अधिक करून मुंबई शहरात पहायला मिळतात.

   या उत्सवासाठी अनेक गोविंदा पथके काही महिन्यांआधीपासुनच तयारी करतात. १०० फुटांपेक्षाही वर असलेल्या या दहीहंडीला फोडण्यासाठी या पथकांमध्ये १०० ते १५० लोकांचा समावेश केला जातो. माणसांचे मनोरे रचायला सुरवात होताच त्यांच्यावर पाण्यांच्या धाराही सोडल्या जातात. त्यामुळे खाली चिखल आणि पाणी साचलेलं असतं. अशातही ते कित्येकदा अपयशी होऊनही पुन्हा पुन्हा हंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. शेवटी एखादं पथक यात यशस्वी होतंच. कधी कधी कुणीच यशस्वी होत नाही तेव्हा त्या दहीहंडीची उंची कमी केली जाते. ज्यावेळी गोविंदा एकावर एक उभं राहून मनोरा तयार करतात, तो क्षण खरंच तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके वाढणाराच असतो. त्यामुळेच या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी हजारो भाविक रस्त्यांवर येतात. मुंबईतील अनेक दहीहंड्यांपैकी दादर, लोअर परेल, वरळी, माझगांव, लालबाग, ठाणे आणि बाबू गेणू ह्या अधिक प्रसिद्ध आहेत तर पुण्यातील मंडईची दहीहंडी प्रसिद्ध आहे.

Other Festivals link


AddThis Social Bookmark Button
 

Add comment