चैत्र शु. प्रतिपदेस गुढीपाडवा हे नाव आहे. या तिथीला वर्षप्रतिपदा असेही म्हणतात. शालिवाहन शकाचे वर्ष या दिवसापासून सुरु होते. अखंड भारतात या दिवसाला असाधारण मह्त्व आहे. गुढीपाडवा हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानला आहे. या दिवशी काही धार्मिक विधी सांगितले आहेत. त्यात ब्रम्हपूजा हा महत्त्वाचा विधी असतो. तो असा
| " चैत्रे मासि जगद ब्रम्हा ससर्ज प्रथमेहनि |
| शुक्लपक्षे समग्रं तु तदा सु्र्योदये सति |
| प्रवर्तयांमास तथा कालस्य गणनामपि |
| तत्र कार्या महाशान्ति:सर्व्कल्मषनाशिनी |
| सर्वोत्पातप्रशमिनी कलिदु:स्वप्ननाशिनी " |
| |
याचा अर्थ असा, ब्रम्हदेवाने चैत्र शु. प्रतिपदेच्या सकाळी समस्त जग निर्माण करुन कालगणनाही सुरु केली. त्या तिथीला सर्व उत्पात, सर्व पापे व कलिकृत दु:स्वप्ने यांचा नाश करणारी महाशांती करावी. ब्रम्हदेवाची पूजा झाल्यानंतर विपळे, पळे, घटिका, प्रहर, इ. सर्व कालविभागांची, दक्षकन्यांची व विष्णूची पूजा करावी. यविष्ठ नावाच्या अग्निमध्ये हवन करावे. ब्राम्हणभोजन घालावे व आप्तेष्टांना देणग्या द्याव्या. F10ज्या वारी वर्ष - प्रतिपदा येते त्या वाराच्या अधिपतीची पूजा करावी, असे आणखी एक विधान भविष्य पुराणात सांगितले आहे. या दिवसाचा लौकिक विधी असा --- घरातली सर्व माणसे तैलाभ्यंग करुन उष्णोदकाने स्नान करतात. नंतर कडुलिंबाची पाने भक्षण करतात. कळकाच्या काठीच्या टोकाला रेशमी वस्त्र बांधून त्यावर चांदीचे किंवा पितळेचे भांडे पालथे घालून त्याला कडुलिंबाचे टाळे व फुलाची माळ बांधून दारात तो ध्वज अर्थात गुढी उभारतात. गुढी उभारण्याचा पाडवा म्हणूनच याला "गुढीपाडवा" असे म्हणतात. दुपारी मिष्टात्राचे भोजन करतात. उपाध्याकडून नूतन वर्षाचे पंचांग अर्थात वर्षफल श्रवण करतात. या पंचांग श्रवणाचे फल सांगितले आहे, ते असे --
| " तिथेश्च श्रीकरं प्रोक्त वारादायुष्यवर्धनम |
| नक्षत्राव्दरते पापंयोगाद्रोंगनिवारणम |
| करणा च्चिन्तितं कार्य पञ्चाड:गफमुत्तमम |
| एतेषा श्रवणात्रित्यं गर्डू;गास्नानफलं लभेत " |
| |
याचा अर्थ असा, तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी लाभते. वाराच्या श्रवणाने आयुष्य वाढते. नक्षत्रश्रवणाने पापनाश होतो. योगश्रवणाने रोग जातो. करणश्रवणाने चिंतिले कार्य साधते. असे हे पंचांग श्रवणाचे उत्तम फल आहे. त्याच्या नित्यश्रवणाने गंगास्नानाचे फल मिळते. या तिथीला "युगादितिथी" असेही म्हणतात. या दिवशी शक्य असेल तर पाणपोयी घालावी. निदान उदकुंभाचे तरी दान करावे असे सांगितले आहे. हा दिवस इष्ट,मित्र व कुटुंबातील मंडळी यांच्यासह आनंदात घालविल्याने वर्षभर सुख लाभते,असे याचे फल आहे. चैत्र हा अधिकमास असता, काहींच्या मते अधिकमासाच्या शुध्द प्रतिपदेस वर्षारंभाची धार्मिक कॄत्ये करावी; तर काहींच्या मते ती शुध्द किंवा निज चैत्राच्या प्रतिपदेस करावी, असा मतभेद आहे. याविषयी धर्मसिंधूने निर्णय दिला आहे, तो असा - अभ्यंगस्नानादी कॄत्ये अधिक मासाच्या शुध्द प्रतिपदेसच करावी; पण गुढी उभारणे, कडुलिंबाची पाने खाणे, पंचांग श्रवण करणे या गोष्टी शुध्द चैत्राच्या प्रतिपदेस कराव्या.