नव्याने स्नेहाचे संबंध निर्माण करण्याची संधी व स्नेह वृद्धिंगत करणारा सण म्हणजे संक्रांत
साजरे करु मकर संक्रमण
करुण संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन
तिळगुळांची करु खैरात…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
मकरसंक्रांत हा सण भारतात विविध ठिकाणी विविध प्रकारे साजरा केला जातो. महाराष्ट्र(मकरसंक्रांत) तर पंजाबमध्ये(लोहडी) आणि तमिळनाडू(पोंगल) व येवल्यातील(पतंगोत्सव) असे विविध वैशिष्टय जपणारा हा सण आहे.
सूर्याने एका राशीतून दुसर्या राशीत जाणे म्हणजे 'संक्रमण करणे'. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. यामुळे या सणाला 'मकरसंक्रांत' असे म्हणतात. या दिवशी सूर्य पृथ्वीची परिक्रमा करण्याची दिशा बदलतो. म्हणजेच सूर्य थोडा उत्तरेकडे झुकतो. यामुळे या वेळेला उत्तरायण असेही संबोधतात. सूर्याच्या संक्रमणासोबतच जीवनाचे संक्रमण जोडले आहे. यामुळे या उत्सवाला सांस्कृतिक दृष्टीनेही महत्त्व आहे.
आरोग्यासाठी आणि कल्याणासाठीही तीळ महत्त्वाचेच आहेत. तीळ जल स्नान, तीळ दान, तीळ भोजन, तीळ जल अर्पण, तीळ आहूती, तीळ उटणे अशा प्रकारे तीळाचा उपयोग केला जातो. गुळाची पोळी हे या सणाचे वैशिष्ट्य! तिळाचे लाडू किंवा वडया याही या सणांच्या निमित्तानेच बनतात. या काळात वाटाणे, ओले हिरवे हरभरे, गाजर, ऊस, शेंगा बोर हे शेतातले नवीन उत्पन्न येतं त्यामुळे याच पदार्थाचे वाण देण्याचीही पद्धत आहे. या सणाच्या निमित्ताने परिचित लोकांकडे जाणे, जुनी भांडणे विसरून नव्याने स्नेहाचे संबंध निर्माण करण्यासाठी ही छान संधी असते.
महाराष्ट्रात हा सण दोन दिवस साजरा करतात. यास भोगी (सामान्यतः १३ जाने), संक्रांत (सामान्यतः १४ जाने) अशी नावे आहेत. संक्रांतीस आप्तस्वकीयांना तिळगुळ आणि वाणवाटून 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते.
दरवर्षीच्या मकरसंक्रांतीबरोबरच येवल्यात पतंगोत्सव साजरा होत असतो. संक्रांतीच्या या दिवसात घराच्या गच्च्यांवर, कौलांवर, पत्र्यांवर जाऊन पंतग उडविला जातो. पतंगाप्रमाणे मन ही आकाशात गिरक्या घेत असतं. गाण्याच्या तालावर लोक पतंग उडविण्यात धुंद असतात.
अशाच प्रकारे तमिळनाडूमध्ये ’पोंगल’ नावाने हा सण साजरा केला जातो. सौर पंचांगानुसार पोंगल महिन्याच्या पहिल्या तारखेला येतो. हा शेतकऱ्यांचा उत्सव मानला जातो. तो तीन दिवस असतो. पहिल्या दिवशी घरातील सगळा कचरा एकत्र करून जाळला जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. तिसऱ्या दिवशी घरातील पशूधनाची पूजा केली जाते.
मकरसंक्रांत पंजाबामध्ये ’लोहडी’ म्हणून साजरी केली जाते. शीखांच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा उत्सव आहे. मकरसंक्रांतीच्या एक दिवस अगोदर लोहडी साजरी केली जाते. घरात नुकतीच सून आली असल्यास किंवा पहिला मुलगा झाला असल्यास या लोहडीचे महत्त्व काही वेगळेच असते.
अग्नी प्रज्ज्वलित केल्यानंतर त्याच्या सभोवताली तांदूळ, रेवडी आणि साखरफुटाणे यांची उधळण केली जाते. उपस्थित लोक ते उचलतात. या अग्नीतून मक्याच्या लाह्या वा शेंगदाणे जो कोणी उचलतो त्याची इच्छा पूर्ण होते, अशी समजूत आहे. यानंतर नाच-गाण्याचा कार्यक्रम होतो. महिला एकत्र येऊन पारंपरिक गाणी म्हणतात. नाचतात. रात्रीच्या भोजनात मक्याची रोटी, सरसों का साग असते. अशा प्रकारे आनंद साजरा केला जातो.
पतंग कितीही उंच उडाला तरीही मांज्याचा रिळ जमिनीवरच राहतो. याप्रमाणेच आपण जीवनात कितीही यशस्वी झालो तरी पाय जमिनीवरच असायला हवे. कधी-कधी पतंग कापलीही जाते. म्हणजेच जीवनात आपण अयशस्वीही होऊ शकतो. पण त्याने घाबरून न जाता नवा पतंग घेऊन त्याला उडविण्याचा प्रयत्न करा. थोडक्यात आयुष्यात अपयश आले तरी ते झटकून नव्याने प्रयत्न करा.
- स्नेहा मुथा