मुंबई : जन्माष्टमीचा सोहळा दरवर्षीमाणे यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला. हंडीचा थरार आणि चित्रपटातील स्टार्सना पाहण्यासाठी सकाळपासूनच मुंबईकर मोठ्या संख्येने घराबाहेर पडले होते. मुंबईत यंदा दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती. गोविंदांचे लागलेले थर कोसळताना बघतांना उपस्थितांच्या काळजात धस्स होत होते. ‘गोविंदा आला रे आला जरा मटकी संभाल ब्रीजबाला' असा सूर धरून सोमवारी सकाळपासूनच शहरात दहीहंडीचा उत्साह दिसून येत होता. यावेळी कल्याणमध्येही ठाणे-मुंबईप्रमाणे यंदा मोठ्या दहीहंडी लावण्यात आल्या होत्या. यावेळी विविध राजकीय पक्षांच्या दहीहंड्यांचे वर्चस्व दिसून आले. एरवी मुंबईत संध्याकाळी उशीरापर्यंत असणारी दहीहंडीची धूम यावर्षी मात्र दुपारीच ओसरली. यावेळी अण्णा हजारे यांचाही प्रभाव या उत्सवावर दिसून आला.
गोविंदांच्या पथकांप्रमाणे महिलांच्या गोपिका पथकांची संख्याही यंदा वाढल्याचे दिसून आले. बहुदा पाचपर्यंत थर रचणा-या गोपिकांनी यंदा सहा थर रचत होत्या. नेहमीप्रमाणे जाहीर केलेल्या बक्षिसांच्या रकमा आयोजकांनी वेळेवर न दिल्याने भांडणांचे वातावरण निर्माण विविध ठिकाणी निर्माण झाले होत. यावर्षी गिर्यारोहकांचे तंत्र वापरून आयोजित केलेल्या डोंबिवली आणि काळाचौकी येथील आणि इतरही हंड्या जास्त आकर्षक ठरल्या.
कल्याण पूर्व-पश्चियम परिसरात मोठ्या प्रमाणात दहीहंड्या ठेवण्यात आल्या होत्या. प्रत्येक थरानुसार बक्षीस देण्यात आले. कल्याणमध्ये यंदा एक ते पाच लाखांपर्यंतची बक्षिसे असणा-या दहीहंड्या होत्या. नेतिवलीमध्ये महेश चॅरिटेबल ट्रस्टची हंडी लावण्यात आली होती. तेथे दुपारपर्यंत दहा ते बारा पथके आली होती. आदर्श मित्रमंडळ, मराठा गोविंदा, म्हसोबा मित्रमंडळ, मंगल राघोनगर मित्रमंडळ, ओम साई मित्रमंडळ, डोंबिवली, ठाकुर्ली आणि गावदेवी परिसरातील पथकांत थरांसाठी चुरस होती. कल्याण पश्चिलमेत युवा कॉंग्रेस प्रायोजित अस्तित्व प्रतिष्ठानच्या वतीने पाच लाख ५५ हजार ५५५ रुपयांची हंडी सहजानंद चौकात उभारण्यात आली होती. दुपारपर्यंत ओम साई मंडळ, दत्तगुरू, जयदत्त मित्रमंडळ, हनुमान सेवा मंडळ आदी गोविंदा पथकांनी सलामी दिली. पुरूषांच्या पथकांबरोबरच पहाटे घराबाहेर पडलेल्या महिला पथकांनीही कल्याण-डोंबिवलीत जाऊन सलामी दिली.
अण्णांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात छेडलेल्या लढ्याला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला त्याचे प्रतिबिंब या दहीहंदी उत्सवातही दिसून आले. कल्याण-डोंबिवलीसह ठाण्यातही दहीहंडी उत्सवावर अण्णा हजारे यांचा प्रभाव दिसून आला. शहरातून फिरताना ते अण्णा हजारे आगे बढो अशा घोषणा देत होते.