दिवाळीच्या निमित्त्याने नुकतीच एका संस्थेस आम्ही भेट दिली. त्यावेळी आम्ही अनुभवलं की, द्रुष्टी असणारी मुलं ही जेवढी चांगली दिवाळी साजरी करु शकत नाही, तेवढी चांगली दिवाळी अंधं मुलं साजरी करतात. दृष्टी नसुन देखील प्रकाशाच्या या सणाला स्वत: अंधारात राहुन, जगाला उजेडात ठेवणारी ही अधं मुलं. ’अधं मुलांचं आयुष्य कसं सुखकर करणार, त्यांना जगासमोर सामान्य मनुष्याप्रमाणे कसं साबीत करणार’ असा दॄष्टीकोन बाळगुन काम करणारी "दि पूना स्कुल अॅन्ड होम फॉर दि ब्लाईंड ट्रस्ट’ ही संस्था आहे. ह्या संस्थेत सद्ध्या १४० अंधं मुली तर २०० अंधं मुले शिक्षण आणि व्यवसायाभिमुख प्रशिक्षण घेत आहेत.
खरं तर याच्यांकडे दिवाळी म्हणजे लगीन घाई सारखा प्रकार असतो. सगळ्यात मोठं दुर्दैव असं की, या अधं मुली प्रकाशाच्या या सणाचा आनंद उपभोगु शकत नाही, पण त्यांचे हात प्रकाशदिवे बनवण्यात अखंड कार्यरत असतात. समाजालाही त्यांची जाणीव झाली आहे की ह्या मुली विशेष आहेत. ज्यांच्यांत एवढं वैगुण्य असुनही, त्या काहीतरी करायला झगडत असतात. कधी यांचं पण कौतुक केलं पाहिजे, हा विचार मनात घेऊन यांनी बनवलेल्या वस्तुंचे प्रदर्शन भरविले जाते. दिवाळीसाठी आवश्यक पणत्या विभिन्न आकारात बनवण्याचं काम त्या करतात आणि त्या विक्रीसाठी ठेवल्या जातात. सुरुवातीला हे काम अगदी नाममात्र होतं. पण नागरिकांचा आणि समाजाचा प्रतिसाद पाहून आता दर वर्षीच उत्पन्न वाढत आहे. यावर्षी त्यांनी मेणाच्या २० ते २५ हजार पत्रा-पणत्या बनविल्या आहेत. दुसरे म्हणजे मातीच्या पणत्याही ५-७ हजार एवढया बनविल्या असुन, खप ही तेवढाच झाला. दिवाळीच्या या दिवसांत यंदाच्या वर्षी त्यांना २५ ठिकाणी प्रदर्शन भरविण्यासाठी बोलवण्यात आले होते. या संस्थेच्या सचिव श्रीमती. रजनीताई ईंदुरकर या मुलींबद्दल सांगतात, "आपल्या मुली जरी स्पेशल असल्यातरी, त्या अशा दीनवान किंवा आम्ही काही करु शकत नाही, या भावनेने जगायला नको. त्यापण जगासमोर आत्मविश्वासाने आपल्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे. आम्ही पण काहितरी करु शकतो, आमच्या पोटापुरतं कमवू शकतो. ही भावना बळवण्याचा प्रयत्न आम्ही नेहमी करीत असतो."
या संस्थेमध्ये हातमाग, शिवणकाम असे विभिन्न कोर्स आहेत. टॉवेल, डस्टर, बेडशीट्स, ज्युटच्या पिशव्या, सतरंज्या ह्या सर्व वस्तु बनवून त्या विकतात. या सर्व उत्पन्नातून अधिकाधिक फायदा कसा होईल याचा विचार ते करतात. याच्यातून त्यांना एक आनंद मिळतो आणि त्यांचां आत्मविश्वासही वाढतो, की आम्ही आमच्या पोटापुरतं कमवू शकतो, आम्ही कोणावर अवलंबुन नाही, याचा त्यांना अभिमान वाटतो. ही जाणीव त्या सर्व उपक्रमातून पुढे येते. त्यामुळे मुलींच्या चेह-यावर निरागस ह्सू बघायला मिळतं. या संस्थेत आयुर्वेद विद्यापीठातून शिक्षक येतात आणि अधंमुलींना प्रशिक्षण देऊन परीक्षा घेतात. प्रमाणपत्रासाठी काही मुली निवडतात. जेणे करुन पुढे जाऊन त्या एका मोबाईल फोन व प्रमाणपत्र एवढ्यावर ४ ते ५ हजार महिना सहज कमवू शकतात. अशा पध्दतीने अंधं मुलींना सक्षम बनवण्याचा प्रयत्नही ही संस्था करते. अशी माहिती संस्थेतील अधिकारी श्रीमती. अर्चना सरनोबत यांनी दिली. ह्या संस्थेत मागील तीन वर्षांपासुन हॉलंड, जर्मनी मधुन स्वयंसेवक येतात आणि संस्थेतील विद्यार्थांना जर्मनी, इंग्रजी भाषा शिकवतात. असे विविध उपक्रम या संस्थेत चालतात.