ताशाचा आवाज तारा रा रा झाला गणपती माझा नाचत आला....
गणेशोत्सव अगदी तोंडावर येऊन ठेपल्याने विविध मंडळे गणेशाच्या आगमनाच्या तयारीला लागले आहेत. गणेशोत्सवाची सुरवात झालेल्या पुण्यातही या उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. पुण्यातील गणपती उत्सवाची अनेक वैशिष्टये आहेत त्यातीलच एक म्हणजे विविध गणेश मंडळांसमोर वाजवले ढोल ताशांची पथके. पुण्यात अनेक ढोल ताशांची पथके असून त्यांनी डिजेच्या वाढत्या क्रेझमध्येही आपलं वेगळेपण जपलंय हे विशेष. या पथकांना गेल्या कित्येक वर्षांची परंपरा आहे. त्यामुळेच गणेशोत्सव म्हटला की लोकांना पुण्यातील ढोल ताशांचं एक वेगळंच आकर्षण असतं. या पथकांच्या तालमी गणेशोत्सवाच्या एक दिड महिना आधीपासून सुरू झाल्या आहेत.
पुण्यातील ही ढोल ताशांची पथके अतिशय वेगळी आणि आकर्षक असतात. एका एका पथकात २०० ते ३५० तरुण-तरुणी ढोल वाजवतात. सध्या विविध क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढतोय. त्याचप्रमाणे माणसांचंच काम समजल्या जाणा-या या ढोल ताशांच्या पथकांमध्ये मुलींचाही सहभाग वाढतांना दिसतो आहे. काही पथकांमध्ये तर निव्वळ मुलीच ढोल ताशे वाजवतांना दिसून येतात आणि त्या कुठेही मुलांपेक्षा कमी पडत नाहीत. पुण्यात असणा-या अनेक पथकांपैकी काही प्रमुख पथकांमध्ये नादब्रंह्म, शिवगर्जना, रमणबाग, ज्ञानप्रबोधिनी, विमलाबाई गरवारे ह्या पथकांचा समावेश करता येईल.
या पथकांपैकी शिवगर्जना हे पथक तर अधिक प्रसिद्ध आहे. त्याचं कारण म्हणजे या पथकात २०० ते ३५० तरुण-तरूणी ढोल ताशे वाजवायला येतात. या पथकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या पथकाने प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांच्या ‘उलाढाल’ या चित्रपटातील ‘मोरया मोरया’ या प्रसिद्ध गाण्यासाठी ढोल ताशे वाजवले आहेत. आजही ज्या ज्या ठिकाणी या संगीतकार जोडीचा लाईव्ह शो असतो तिथे हे पथक वाजवायला जातं. त्याचप्रमाणे ज्ञान प्रबोधिनी हे पथकही प्रसिद्ध आहे कारण या पथकात ढोल ताशे वाजवणा-यांमध्ये एकही मुलगा नसून सर्वच मुली आहेत. मुली असूनही त्या मुलांच्या पथकांना तोडीस तोड वाजवतात हे विशेष. हे पथक विसर्जन मिरवणूकीत आकर्षणाचं केंद्रबिंदू असतं. हजारोंच्या संख्येने गर्दी केलेले भक्तही त्यांना भरभरून प्रतिसाद देतात. या पथकांना वाजवण्यातून मिळणारा पैसा हा कुणालाही वाटला जात नसून ढोल ताशांच्या दुरूस्तीसाठी, मुलांच्या जेवणासाठी खर्च केला जातो.
दरवर्षी पुण्यातील मानाच्या गणपतीसमोर ढोल ताशे वाजवणं हे या पथकांसाठी मानाचं मानलं जातं. तसंच या पथकांचं वैशिष्ट्य म्हणजे गणेशोत्सवा व्यतिरीक्त हे कुठल्याही उत्सवाला वाजवत नाहीत. यातील मुलांना कुठलही व्यसन करून वाजवण्यास बंदी आहे. कुणी आढळल्यास त्याला त्याक्षणीच पथकातून काढून टाकल्या जातं. एक कडक शिस्त या सर्वच पथकांमध्ये पाळली जाते. सध्या पथकांच्या तालमींनी चांगलाच जोर धरला असून गल्लो-गल्ली, नदीच्या किनारी, विविध शाळांच्या मैदानावर त्यांच्या तालमी पाहण्यास लोक सध्या गर्दी करत आहेत.