
मराठी चित्रपटांच्या विषयांची, विविध कथा कल्पनांची व्याप्ती वाढत असली तरी कुटुंबव्यवस्था, त्याशी निगडीत नातेसंबंध यावर आधारलेल्या चित्रपटांची संख्या खूप मोठी आहे. कौटुंबिकपटांकडे मरठी प्रेक्षकांचा असलेला कल ध्यानात घेता त्यांना मिळणारे यश अपेक्षितच आहे. अशाच वेगळ्या कौटुंबिक कथेवर ’नोमॅड फिल्मस’ आणि ’अक्षर फिल्मस’ या निर्मिती संस्थांनी एकत्र येऊन आकारास आलेला ’अनोळखी हे घर माझे’ हा कौटुंबिक मराठी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. जुनेद मेमन - शेखर मोरे यांची निर्मिती असलेल्या ’अनोळखी हे घर माझे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन देव यांनी केले आहे.
अशोक सराफ, तुषार दळवी, कविता लाड, मेघना वैद्य, सुशांत शेलार, उदय टिकेकर या लोकप्रिय कलाकारांसोबत शितल मौलिक, सुप्रिया पाठारे, तृष्णा बेलतंगडी, उमेश मिटकरी या कलाकारांच्या यात भूमिका आहेत. गीतकार प्रवीण दवणे, गुरु ठाकुर यांच्या भावगर्भ गीतांना आशिष रेगो - के. सी. लॉय यांनी दिलेले बहारदार संगीत आगामी ’अनोळखी हे घर माझे’ चे आकर्षण ठरणार आहे.
’अनोळखी हे घर माझे’ च्या श्रवणीय गीतांच्या ध्वनीफितीचा प्रकाशन सोहळा हिंदीतील लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख यांच्या हस्ते वांद्रे येथील हॉटेल ’ताज लॅ़ड्स एन्ड’ येथे नुकताच संपन्न झाला आहे. याप्रसंगी ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता सचिन पिळगांवकर, माजी नगरपाल श्री. किरण शांताराम तसेच चित्रपटाच्या तंत्रज्ञ व कलावंतांसोबत हिन्दी-मराठी चित्रपटासृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
या चित्रपटात सहा गीते असून ती पुढीलप्रमाणे -
| गीत | गीतकार | गायक |
| १. हॅपी बर्थ डे... | प्रवीण दवणे | रविंद्र साठे, प्रिता मजुमदार, नेहा राजपाल |
| २. कोण आपले... (गायक) | प्रवीण दवणे | रविंद्र साठे |
| ३. एकांत हा गुलाबी... | गुरु ठाकूर | सौरभ, पं. श्रीवास्तव, प्रिता मजुमदार, नेहा राजपाल, के. सी. लॉय, साधना सरगम, अरुण इंगळे |
| ४. मुक्या मुक्या | प्रवीण दवणे | रविंद्र साठे, प्रिता मजुमदार, के. सी. लॉय, क्षितीज वाघ |
| ५. अंगाई गीत | प्रवीण दवणे | साधना सरगम |
| ६. कोण आपले... (गायिका) | प्रवीण दवणे | साधना सरगम |

निर्माते जुनेद मेमन आणि शेखर मोरे यांचा ’अनोळखी हे घर माझे’ हा पहिलाच मराठी चित्रपट असला तरी अनुभवी कलाकार आणि तंत्रज्ञांची साथ लाभल्यामुळे कोणत्याही प्रकारचा नवखेपणा तुम्हाला या निर्मितीत दिसणार नाही असा विश्वास त्यांना वाटतो. सचिन देव या दिग्दर्शकाचा हा पहिलाच सिनेमा असला तरी छोट्या पडदयावरचा बराच मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. आजवर त्यांनी ’सारथी’, ’शगुन’, ’भाभी’, ’कभी आए ना जुदाई’, ’मंझिले अपनी अपनी’, दिल है के मानता नही’, ’पंचम’, ’मीत’, ’तुम बीन जाऊ कहॉ़’ अशा अनेक मालिका दिग्दर्शित केल्या आहेत.
कौटुंबिक नातेसंबंधांची हदयस्पर्शी मांडणी असलेल्या ’अनोळखी हे घर माझे’ चित्रपटाची पटकथा सचिन देव, सचिन दरेकर आणि ज्ञानेश भालेकर यांनी लिहिली असून संवाद सचिन दरेकर यांनी लिहिले आहेत. या चित्रपटाची गीते रविंद्र साठे, साधना सरगम, नेहा राजपाल, प्रीता मुजुमदार, अरुण इंगळे, सौरभ श्रीवास्तव या गायकांनी गायली आहेत. विचारांच्या वादळातून आपल्याच नात्याच्या, प्रेमाच्या माणसांच्या मायेला पारखं होणा-या एका अनोख्या घराची कथा ’अनोळखी हे घर माझे’ मध्ये रेखाटण्यात आली आहे. चित्रपटाचे छायाचित्रण राजा सटाणकर- राहुल जाधव यांनी केलं आहे.
’अनोळखी हे घर माझे’ चित्रपटातील प्रत्येक गीत हे वेगवेगल्या भावछटा रेखाटणारे आहे. चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्याअगोदर त्यातील सुश्राव्य गीतांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.