
मराठी चित्रपटांचा "जय हो!" असे सध्या म्हटले तर वावगे ठरणार नाही. मराठी सिनेमा चालत नाहीत हा समज खोटा ठरवण्या इतपत मराठी चित्रपटाची चलती सुरु झाली आहे. पण मराठी चित्रपट खरचं गल्ला जमवतात का ? संशोधनाचा विषय आहे. ह्या महीन्याचीच गोष्ट बघाल तर बॉलिवुडने स्ट्राईक केला. एकही हिंदी सिनेमा मल्टीफ़्लेक्समध्ये वा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला नाही, कारण काय तर "corporate" जगताने चित्रपट प्रदर्शनाच्या क्षेत्रात येऊन प्रस्थापित लोकांच्या खिशावर मारलेला डल्ला! हे सगळं जाऊ द्या हो. पण या स्ट्राईकचा फायदा मराठी चित्रपटांना उठवता आला का ?, हा या लेखाचा प्रपंच !
या महिन्यात "शिवाजीराजे...", "सुंदर माझं घर", "बोक्या सातबंडे", "नऊ महिने नऊ दिवस", "भागमभाग", आणि "नातं मामा भाचीचं" असे सहा वेगवेगळे विषय असलेले चित्रपट प्राईम टाईममध्ये मल्टीफ़्लेक्समध्ये प्रदर्शित झाले. विषय, टेकिंग, स्टारकास्ट सगळं वेगवेगळं असुन सुध्दा मार्केटिंग अभावी तिकिट बारीवर गल्ला जमवण्यात हे चित्रपट कांही यशस्वी होताना दिसत नाही. अजुनही मराठी इंडस्ट्री या शो बिसनेसमध्ये टिकण्यासाठी चार आण्याचं प्रॉडक्ट व बारा आण्याचं मार्केटिंग करावं लागतं हा बॉलिवुडने आत्मसात केलेला गुरुमंत्र मानण्यास तयार होत नाहीत, असं दिसतं. त्या उलट निर्माता, दिग्दर्शक व हिंदीत नाव प्रस्थापित केलेले श्री.महेश मांजरेकर
यांनी बरोबर हीट पिक्चर (कदाचित फक्त गल्ला जमा करण्याच्या दृष्टीने) देण्याचा फार्मुला हिंदी चित्रपटाच्या अनुभवामुळे आत्मसात केला व त्याचा पुरेपुर उपयोग त्यांनी "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय" या चित्रपटात केला. हिंदी निर्माता संजय छाब्रीया यांनीसुध्दा महेश मांजरेकरांबरोबर मार्केटिंगसाठी हात आखडता न घेता (कदाचित हिंदी इंडस्ट्रीतील निर्माता असल्यामुळे) जोरदार मार्केटिंग केले. परिणाम आपल्या समोरच आहे. आज "शिवाजीराजे..." सगळीकडे हाऊसफुल्ल गर्दीत चालत आहे.
मराठी चित्रपटांचे बजेट जसे वाढते आहे त्याच प्रमाणात चित्रपटांच्या मार्केटिंगचे पण बजेट वाढविले पाहिजे, एवढा जरी विचार मराठी निर्मात्यांमध्ये या स्ट्राईकमुळे जागृत झाला तरी खुप झालं. म्हणतात ना "कळतयं पण वळत नाही".
जय हो मार्केटिंग की !