निशाणी डावा अंगठा

कादंबरीकार रमेश इंगळे उत्रादकर यांच्या ’निशानी डावा अंगठा’ या कादंबरीतील वेगळेपणाने प्रख्यात दिग्दर्शक पुरुषोत्‍तम बेर्डे यांनी प्रेरणा घेऊन याच नावाचा मराठी चित्रपट २२ मे पासुन रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला. शिक्षण क्षेत्रातील कारभारावर उपहासात्मक भाष्य करणारा चित्रपट आहे.

’अष्टविनायक चित्र’चे दिलीप जाधव व विक्रम जोशी यांनी या कादंबरीवर चित्रपट निर्माण करण्याची इच्छा पुरुदादांजवळ व्यक्‍त केली. विशेष म्हणजे ’भस्म’ नंतर तब्बल १२ वर्षानंतर पुरुषोत्‍तम बेर्डे यांनी ’निशानी डावा अंगठा’ च्या निमित्‍तांने मराठी चित्रपट निर्मितीत पुनरागमन केले आहे.

 


या चित्रपटाची पटकथा व संवाद लेखन मराठवाड्याचे सिद्धहस्त लेखक अजित दळवी व प्रशांत दळवी यांचे आहे. कॅमरामन समीर आठल्ये यांनी हा वास्तवातील विषय चित्रबद्ध केला आहे. या चित्रपटात मुरब्बी कलावतांची फौजच आपला अभिनय या चित्रपटात पणाला लावणार आहे. ते कलाकार म्हणजे अशोक सराफ, दिलीप प्रभावलकर, डॉ. मोहन आगाशे, मकरंद अनासपुरे, निर्मिती सावंत, विनय आपटे, ऋषिकेश जोशी, मंगेश देसाई, भारत गणेशपुरे इत्यादी. शिवाय भरत जाधव आणि संजय नार्वेकर यांची पाहुणे कलाकार म्हणुन उपस्थिती उल्लेखनिय ठरेल.

Bharat Jadhav And Sanjay Narvekarनिशाणी डावा अंगठा चित्रपटासाठी गाणी लिहिली आहेत युवा गीतकार संदीप खरे यांनी. या गाण्यांचे वैशिष्ठ्य म्हणजे ही गाणी खानदेशी बोली-भाषेतील आहेत व डॉ. सलील कुलकर्णी यांनी त्यांना संगीतबद्ध केले आहे. दुसरे वैशिष्ठ म्हणजे मकरंद अनासपुरेने खास खानदेशी ठसक्यात ’बाप्पा आता कामंच झाल ना ... ’ हे गीत स्वत:च्या आवाजात स्वरबद्ध केले आहे. अवधुत गुप्ते, सलील कुलकर्णी, संदीप खरे, मिथीलेश पाटणकर व यज्ञेश्वर लिंबेकर यांनीही आपल्या सुरेल आवाजाची किमया या चित्रपटात दाखविली आहे. या चित्रपटांचे नृत्य दिग्दर्शक केले आहे दिपाली विचारे यांनी व वेशभुषा आहे असिता नार्वेकर यांची. संकलन केले आहे राजेश राव यांनी तर कला दिग्दर्शन अरुण रहाणे यांनी केले आहे.

ग्रामीण भागातील काही इरसाल, बनवेबाज शिक्षक आणि अधिका़-यांमुळे शिक्षण क्षेत्रातील साक्षरता अभियानाची प्रत्यक्षात झालेली दशा आणि ते तपासणी पथकापासून लपविण्याचे प्रयत्‍न याचे वास्तवादी चित्रण कलात्मक शैलीत पुरुषोत्‍तम बेर्डे यांनी ’निशाणी डावा अंगठा’ या चित्रपटातुन प्रेक्षकासमोर आणले आहे. हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकाना दिलेली अद्वितीय कलाकृतीची भेटच. म्हणुन उन्हाळी सुट्टीत हा चित्रपट पहावाच.