zagmag.net - Entertainment Portal for Global Maharashtra पाऊले चालती पंढरीची वाट
E-mail

संपूर्ण विश्चामध्ये कदाचित हिंदू संस्कृतीच एक अशी आहे की प्रत्येक महिन्यात कोणता ना कोणता तरी एक सण / उत्सव हा येतोच. आपली पूर्वापार जी परंपरा आहे त्याप्रमाणे प्रत्येक सण-उत्सव आपण साजरा करत असतो. असे सण उत्सव साजरे करत असताना कदाचित ब-याच जणांना त्या सणा विषयी, उत्सवा विषयी किंवा त्यांच्या महत्वा विषयी माहिती नसते. कदाचित आपण माहिती करुनही घेत नसु. घरातील वडीलधारी मंडळी सांगतात त्याप्रमाणे तो सोहळा साजरा करायचा असेच प्रत्येक घरात घडते. म्हणुनच आपल्या सण उत्सवांची माहिती आपल्याला व्हावी म्हणुन लिहीत आहे आषाढी एकादशी बद्दल.
संपूर्ण वर्षभरामध्ये साधारणता: चोवीस एकाद्शी येतात. प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षात एक व शुक्‍ल पक्षात एक. दोन एकादशी ह्या अधिक मास असल्यास जादा असतात. या सर्वांमध्ये आषाढी व कार्तिकी एकाद्शीस अनंन्य साधारण महत्‍व आहे. असे मानण्यात येते की, आषाढी एकाद्शीस भगवान श्रीविष्णु हे झोपी जातात म्हणुन त्यांस शयनी एकादशी म्हणतात व कार्तिकी एकादशीस प्रबोधिनी एकाद्शी, कारण या दिवशी भगवान श्रीविष्णु जागे होतात म्हणुन म्हणतात.
आपल्या हिंदू संस्कृतीत ही एक गोष्ट मात्र नक्की आहे कि कोणत्याही रुढीला, परंपरेला काहीतरी एक कारण आहे किंवा त्यामागे एखादी गोष्ट आहे. त्याप्रमाणे या एकादशीबद्दल सुद्धा एक गोष्ट आहे. असे सांगितले जाते कि, मुदुमान्य नावाच्या राक्षसाने एकदा खूप मोठी तपश्वर्या भगवान शंकराची केली. भोळे शंकर भगवान त्याच्या कडक तपश्चर्येने प्रसन्न झाले व त्याला वर दिला की ’तु फक्‍त एका स्त्रीच्या हातून मरशील.’ राक्षसच तो मृदुमान्य या वरामुळे अधिकच उन्मत्‍त झाला त्याने सगळीकडे संहार चालु केला. त्याने सर्व देवतांना लढाईत पराभूत करुन टाकले. सर्व हरलेले देव शंकर भगवानांकडे गेले पण स्वता:च त्याला वर दिला असल्यामुळे, शंकरभगावानांचे त्याच्या पुढे काही चाले ना! सर्व देव एका गुहेत जाऊन लपले. त्या गुहेत सर्व देवता दाटीवाटीने बसले होते तेथे सर्वांच्या श्वासातुन एक देवता निर्माण झाली. तीचे नाव एकादशी. एकादशीने मृदुमान्य राक्षसाला ठार करुन सर्व देवतांची सुटका केली. सुटका झालेले देव परतत असताना पाऊसात सर्वांना स्नान घडले व गुहेत लपुन बसल्यामुळे त्यांना काही खायला मिळाले नाही, त्यामुळे उपसाव ही घडला. हिच परंपरा पुढे एकादशीच्या दिवशी रुढ झाली. म्हणजे एकादशीच्या दिवशी उपवास करण्याची.
एकादशीचे व्रत कसे साजरे करावे यासाठी आपल्या शास्त्रात सांगितले आहे कि सकाळी आंघोळ झाल्यानंतर आपल्या कुलदेवते बरोबर विष्णूची पूजा करावी. पुजा करताना तुळशीची एक हजार किंवा एकशे आठ पाने वाहावीत, उपवास करावा. उपवास तुळशीपत्र घेऊन सोडावा. त्यादिवशी रात्री भजन-किर्तन करावे, हरी कथा श्रवण करावी. दुस-या दिवशी सूर्यादयानंतर पारणे सोडावे. ज्येष्ठ महिन्यात शुक्ल पक्षात येणा-या एकादशीला भाविक साधा पाण्याचा एक थेंब देखील घेत नाहीत. त्यामुळे या एकादशीला निर्जल एकादशी म्हणतात.
महीना आषाढ महिन्यातील एकादशी ही फार पवित्र मानण्यात येते. याला महाएकादशी असे म्हणतात. पांडुरंगाच्या भेटीसाठी वारकरी मंडळी लांबचा प्रवास करुन पंढरपूरला येतात. आषाढी एकादशीस देहूहुन तुकाराम महाराजांची, आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची, त्र्यंबकेश्वरहून संत निवृत्‍तीनाथांची, पैठणहून एकनाथ महाराजांची, सासवडहून सोपानदेवांची, दहिठण्याहुन दहिठणकरांची तसेच उत्‍तर भारतातून संत कबीरांची पालखी निघते. या सर्व पालख्या व त्याबरोबर लाखोंच्या संख्येने येणारे वारकरी सर्व जण चंद्रभागेच्या तीरावर एकत्र जमतात. सर्व वारकरी टाळ-मृदुंगाच्या साथीने मुखी पांडुरंगाचे नाव घेत, लेकी-सुना, आया-बहिणी डोक्यावर तुळशी वृंदावन घेत, तर कधी रस्त्यात फुगडी घालत, आपल्या पोराबाळांसह पांडुरंगाच्या भेटीसाठी येतात. आषाढी एकादशीचा दिवस हा पवित्र दिन. या दिवसाची वाट पाहत विठ्ठल चरणी आपली सेवा अर्पण करण्यासाठी खुप लोक पंढरपुरला येऊन निस्वार्थ भावाने जनसेवा करतात. विठ्ठल भक‍तीच्या ओढीने लोक एक प्रकारे पंढरपुरकडे खेचले जातात. या सर्व लोकांना बळ देणारी एक दैवी शक्‍ती अजूनही अस्तित्वात आहे याचा प्रत्यय आजही आषाढी एकादशीला पंढरपुरी आल्यावर येतो. अशी ही महापवित्र हिंदू संस्कृतीतील आषाढी एकादशी.

 
Zagmag Bazzar
Your Cart is currently empty.

Our partners






Transaction Processing
Terms and Conditions