 उत्कृष्ट गायक, परफार्मर, अभिनेता, यशस्वी संगीतकार, जोडीला निवेदनाचंही कसब.... ही सगळी वैशिष्ठ्ये त्यागराज खाडीलकर या एकाच व्यक्तीची. आजवर वेगवेगळ्या रुपात त्यागराज प्रेक्षकांच्या समोर आला. पण आता कीर्तनकार आईचा हा मुलगा रॉकस्टार झाला आहे.
पणजोबा कृष्णाजी, आजी इंदिराबाई तसेच आई मंजुश्री यांच्याकडून नाट्यसंगीताचा वारसा लाभल्यामुळे घरातूनच संगीताचे संस्कार झालेला त्यागराज खाडीलकर हा गायक, पारंपारिक तसेच आधुनिक अशा दोन्ही प्रकारच्या संगीताच्या जादूने कानसेनांना तृप्त करत आहे. कोल्हापूरमध्ये जन्मलेला असूनही पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेणा-या त्यागराजने किराणा घराण्याचे पं. पिंपळखरे यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं आहे. भावगीत तसेच नाट्यसंगीतामध्ये रममाण होऊनही काळानुरुप स्वत:ला बदलून तरूणाईलाही आपल्या संगीताच्या ठेक्यावर ताल धरायला लावणारा त्यागराज आता नवीन अल्बम घेऊन आला आहे, या अल्बमचे नाव आहे ’मस्त... Is a Mast!’ आजच्या तरूणाईला आवडतील अशी, त्यांच्या भावविश्वाशी निगडित आठ रॉकिंग गाणी यात आहेत. यात हार्ड रॉक आहे, हिपहॉप, मराठी भांगडा आणि रॉकच्या फ्लेव्हरमधली गवळणही आहे. मनिषराज या अमेरिकेत राहणा-या मराठी तरुणानं ही गाणी लिहिली आहेत. त्यामुळे एक अस्सल तरूणबाज (westernizes+ Indian music flavor) या गाण्यांना मिळाला आहे हे या मस्त अल्बमचं खास वैशिष्ट्य.
त्यागराज खाडीलकरनी ही आठही गाणी गायली आहेत. संगीतही त्यागराजनी दिलं आहे. यापूर्वी त्यागराजनं नाटकं, चित्रपटांना संगीत दिलं आहे. ’कायद्याचं बोलां’, ’जाऊ तिथे खाऊ’ अशा मराठी चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं आहे व त्या चित्रपटातली गाणीही खूप गाजली होती परंतु अल्बम म्हणून संगीत दिलेला ’मस्त’ हा पहिलाच अल्बम आहे. त्यागराज म्हणाला की, ’मस्त.....’ हा अल्बम आजच्या मराठी तरूणांसाठी आहे. त्यांची स्वप्न, अपेक्षा आणि समस्या याची गुंफण गीत-संगीताच्या माध्यमातून ’मस्त.....’ मध्ये करण्यात आली आहे. आजच्या आधुनिक संगीताचा गंध रेहमानने ऑस्करपर्यंत नेला तसाच गंध ’मस्त.....’ मध्ये अनुभवायला मिळेल. त्यामुळे कर्तव्यपूर्ततेची जाणीव, आधी श्रम नंतर आठवड्याच्या शेवटी मस्त मजा करायची हे सांगताना टेन्शन न घेण्याचा फंडा या अल्बममध्ये आहे.
|