
मराठी रंगभूमी, मराठी मालिका आणि चित्रपट असा प्रवास करणारा श्रेयस तळपदे बॉलीवूडमध्ये एवढ नाव कमवेल असं त्यावेळी कोणालाही वाटले नव्हते. बॉलीवूडमध्ये त्याने ’आंखे’, ’इक्बाल’, ’अपना सपना मनी मनी’, ’डोर’, ओम शांती ओम’, ’बॉम्बे टू बॅकॉक’, ’वेलकम टू सज्जनपूर’, ’गोलमाल रिटर्न्स’ अश्या विविध विषयांच्या चित्रपटांमध्ये त्यांने विविध व दमदार भुमिका केल्या आहेत. ’इक्बाल’ मध्ये त्याने नसरुद्दीन शहा बरोबर काम केले तर, ’ओम शांती ओम’ मध्ये त्यांने किंग खान म्हणजे शाहरुख खान बरोबर काम केले.
आता श्रेयसने मुक्ता आर्टस बॅनरचा ’पेईंग गेस्ट’ या चित्रपटामध्ये एक वेगळी आणि महत्वाची भूमिका केली आहे. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर जॉनी लिव्हर, आशिष चौधरी, सेलिना जेटली, जावेद जाफरी, नेहा धुपिया, वत्सल सेठ, चंकी पांडे, रिया सेन, सायली भगत इत्यादी कलाकारांनी काम केले आहे. या चित्रपटामध्ये पहिल्यांदाच श्रेयसने एका स्त्रीची भुमिका केली आहे. तसे पुरुषाने स्त्री भूमिका केलेल हे आपल्यासाठी काही नविन नाही. बालगंधर्व, सचिन पिळगावकर, लक्ष्मिकांत बेर्डे, गोविंदा, कमल हसन, रितेश देखमुख आदी अनेक नायकांनी चित्रपटामध्ये स्त्री भूमिका केल्या आहेत.
मुक्ता आर्टस बरोबर श्रेयसने काम केलेला हा पाचवा चित्रपट. चित्रपटाचे निर्माते आहेत सुभाष घई. चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे पारितोष पेंटर यांनी, जे श्रेयसचे कॉलेज मित्र आहेत. पारितोष पेंटर ने ’धमाल’ ची पटकथा लिहीली होती. ’पेईंग गेस्ट’ ही कथा आहे चार मित्रांची, जे नोकरीसाठी थायलंडला जातात. त्याठिकाणी त्यांच्यावर कोण-कोणते प्रसंग येतात ते विनोदी ढंगात आपल्याला पहायला मिळतील. जॉनी लिव्हर हा श्रेयसचा बॉस असतो. त्याला श्रेयस नेहमी फसवत असतो, त्यामुळे तो श्रेयसला हाकलून देतो. मग तो त्याच्याच घरी रहायला येतो, पण जॉनी लिव्हर ची अट असते की दाम्पत्यानाच घरी ठेवायला तयार असतो. मग आता बायको कुठून आणाणार हा प्रश्न या चार युवकांपुढे पडतो आणि मग ’पेईंग गेस्ट’ म्हणून रहाण्यासाठी ते काय शक्कल लढवतात ते यात पहायला मिळेल.