’तुक्या तुकविला नाग्या नाचविला’ चित्रीकरण सुरु
E-mail

’मानिनी’, ’दोघात तिसरा आता सगळं विसरा’, ’बाप रे बाप डोक्याला ताप’ सारख्या यशस्वी चित्रपटाच्या दिग्दर्शनानंतर कांचन अधिकारी ’तुक्या तुकविला नाग्या नाचविला’ हा धमाल मराठी चित्रपट घेऊन येत आहेत. कांचन अधिकारी यांचा हा नवीन चित्रपट सामाजिक विषयावर भाष्य करणारा असून मकरंद अनासपूरे-पुष्कर जोग ही जोडी या कॉमेडी चित्रपटाच्या भन्नाट कथेने समस्त प्रेक्षकवर्गाला दिलखुलास हसवेल यात शंका नाही. ’कैलाशनाथ क्रिएशन्स’ निर्मित ’तुक्या तुकविला नाग्या नाचविला’ चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच पालघर परिसरात सुरु झाले आहे.
’गोदावत इंडस्ट्रीज प्रा. लि.’ प्रस्तुत या चित्रपटाची करमणूकप्रधान कथा कांचन अधिकारी यांनी लिहिली असून पटकथा-संवाद अरविंद जगताप यांनी लिहिले आहेत. चित्रपटाची कथा एकाच घरात राहणा-या दोन भिन्न स्वभावाच्या माणसांवर आधारलेली आहे. काका पोलिस खात्यात हवालदार आणि पुतण्या समाजसेवक. काका पोलिस खात्याचा वापर करुन लाच घेतो आणि पुतण्या माहितीच्या अधिकाराचा वापर करुन लोकांना मदत करतो, उपोषणाला बसतो. दोघांचा टोकाचा स्वभाव चित्रपटात विनोद निर्मिती करतो. तुक्याच्या भूमिकेत मकरंद अनासपुरे, तर नाग्याची भूमिका पुष्कर जोग ने केली आहे. त्यांच्या सोबत मोहन जोशी, शिल्पा अनासपुरे, मानसी नाईक, सिद्धार्थ झाडबुके, आशिष पवार, क्रांती रेडकर आदी कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.
कांचन अधिकारी दिग्दर्शित ’तुक्या तुकविला नाग्या नाचविला’ या चित्रपटाची वैशिष्टय म्हणजे मकरंद त्यांच्या पत्‍नीसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसंच ’दोघात तिसरा आता सगळं विसरा’, ’बाप रे बाप डोक्याला ताप’ या दोन चित्रपटानंतर कांचन अधिकारी यांच्या सलग तिस-या चित्रपटात मकरंद काम करतोय. ’तुक्या तुकविला नाग्या नाचविला’ यातील प्रकाश राणे यांनी लिहिलेल्या गीतांवर संगीतकार नितीन हिवरकर यांनी संगीताचा साज चढविला आहे. यातील कविता कृष्णमुर्ती यांच्या आवाजातील एक लावणी गीत हिंदी चित्रपट अभिनेत्री दिपशिखा यांच्यावर चित्रीत होणार आहे. चित्रपटाचे कला दिग्दर्शन राजू सापते यांनी केले असून छायाचित्रण महेंद्र रायन करीत आहेत. ध्वनी संयोजन आयुब शेख यांचे तर संकलन आनंद दिवाण करणार आहेत.