कौटिल्य अर्थशास्त्र आणि
आधुनिक व्यवस्थापन - इंद्रियजय हे सर्व
शास्त्रांचे सार
(2)
जी वरती व्याख्यात्मक
विगतवारी दिली आहे तिचा
मागोवा घेतला असता त्यातील
विवेचनात कौटिल्याने चार वर्णांचा
उल्लेख केला आहे. जातीचा
नाही. ही गोष्ट आवर्जून लक्षात
घेण्यासारखी आहे. कौटिल्याच्या
दण्डनीतीवर तो ज्या त्याच्या
अवतीभोवतीच्या द्वेष्ट्यांच्या
जंजाळात वावरत होता त्या
परिस्थितीत चंद्रगुप्तासारख्या
दासीपुत्राला कर्तबगार सम्राट
बनविण्यासाठी हाती धरण्याचे
धाडस त्याने दाखविले त्यातील
कडक नीतीची व शिस्तीची छाया
त्याच्या दण्डनीतीवर पसरलेली
दिसते; त्यामुळे एकूण पार्श्वभूमी
लक्षात न घेणाऱया
चिकित्सकांकडून एका बाजूला
दुटप्पीपणाचा थर दुसऱया बाजूला
अवास्तवतेचा दोषारोप त्याच्यावर
केला जातो ते स्वाभाविक वाटते.
चंद्रगुप्ताचे गुप्तहेर खाते मोठे
विलक्षण दिसते. त्यामधील
नियमबाह्य रचना आणि
त्यांच्यावर सोपविल्या जाणाऱया
जबाबदाऱयांची माहिती वाचली
म्हणजे कौटिल्यानंतर दोन हजार
वर्षांपेक्षा अधिक काळी झालेल्या
दुसऱया महायुद्धातील गुप्तहेरांच्या
कामगिरीची आठवण होते.
गुप्तहेरांनी कशाप्रकारे वेषांतर
करावे याचे प्रतिपादन करताना
चाणक्य म्हणतो
कापटिकोदास्थित
गृहपतिक
वैदेहकतापस व्यज्जनान् सत्रितीक्ष्ण
रसदभिक्षुकीक्ष।
कापटिक याचा अर्थ दुसऱयाचे
ह्रदगत जाणण्यात कुशल असा
प्रौढ. अशा कापटिकाला द्रव्यादी
बक्षीस देऊन आणि त्याचा सन्मान
करून जे जे रहस्य अर्थात
दुष्टाव्याचे कळेल त्याची त्याची
माहिती आपणाला देण्यासाठी
त्याजकडून राजनिष्ठेची शपथ
घ्यायची.
ज्याचे वर्तन शुद्ध आहे अशा
संन्याशाला `उदास्थित' म्हणतात.
अशा संन्याशांना हाताशी धरून
त्यांना आवश्यक तो पैसा आणि
शिष्यवर्ग म्हणून माणसे पुरवून
त्यांना राज्याच्या वेगवेगळ्या
विभागात रवाना करीत. ते तिथे
जाऊन शेती किंवा व्यापार करून
स्थायिक होत आणि आपल्या
शिष्यांना त्या विभागात
ठिकठिकाणी पाठवून बातम्या
आणीत. आज हेरखात्याला
अथवा पोलीसखात्याला बातम्या
पुरविणारे जसे खबरे असतात
तशाच स्वरूपाची ही पद्धत
कौटिल्याने अडीच हजार
वर्षांपूर्वीही अवलंबली होती.
कौटिल्याच्या या पद्धतीत
`गृहपतिक' म्हणजे शेती, गोरक्षण
करणारे व `वैदहेक' म्हणजे
व्यापार करणाऱयांना म्हटले जाई.
कौटिल्याच्या या गुप्तहेर
पद्धतीत आणखी एक वर्ग असे
आणि तो असे `तापस व्यंजन'
नावाचा. वैदिक काळाचा पगडा
असलेल्या त्या काळात तपरची
(बैरागी) हा आदरणीय मानला
जात असे. अशांना समाजाचा
त्यांच्या चरितार्थासाठी मोठाच
आधार असे. कौटिल्याच्या या
वर्गात दोन प्रकारचे तापस असत.
एक म्हणजे पूर्णत मुंडन केलेला
व दुसरा जटाधारी. त्यांचा
शिष्यवर्गही तसाच असे. हे दोन्ही
वर्ग एका खेड्यात राहून भिक्षेच्या
मिषाने ठिकठिकाणी भटकत व
बातम्या काढीत. त्यांच्या
दिमतीला असलेला शिष्यवर्ग
आपल्या गुरुसंबंधी विविध
चमत्काराच्या व गुरुच्या
महानतेच्या बातम्या पसरवीत.
भोळे भाबडे लोक त्यांच्यावर
विश्वास ठेवीत. आज देखील
लोकात स्वतला प्रतिपरमेश्वर
मानणारे आणि माता यांचा
सुळसुळाट झालेला आहे; पण
त्यांच्या अधपाताचे किस्से
कालांतराने बाहेर पडतातच. पण
त्यांना राजकीय पक्षाचा आश्रय
मिळत असतो. अर्थात सत्तेला
आणि राजकारणावर
चिकटलेल्या या गोचिड्या
आहेत; आलिशान आश्रमात
राहात असतात आणि आलिशान
मोटारीतून ते फिरत असतात,
त्यांचे पगारदारी प्रचारकही
असतात.
कौटिल्याच्या गुप्तहेर व्यवस्थेत
`रसद' नावाचा एक गुप्तहेरांचा
वर्ग असे त्यांचे काम जोखमीचे
असे आणि त्या वर्गात सामील
होणाऱयांसाठी विशिष्ट पात्रता
असे. ती म्हणजे ते सामुद्रिक,
ऐंद्रजाल, भविष्यकथन अशा
विद्या शिकलेले असत. `तीक्ष्ण'
नामक गुप्तहेरांनी मिळविलेली
माहिती गुप्तहेर खात्याच्या
प्रमुखाकडे नेऊन पोहोचविणे हे
त्यांचे काम असे. आज मंत्री
अथवा मोठे राजकारणी यांच्या
पाठीमागे जसे नजर ठेवणारे
गुप्तहेर असतात त्या पद्धतीचा
उगम कौटिल्याच्या अर्थशास्त्रातून
असावा असे मानावी अशीच
परिस्थिती दिसते. या गुप्तहेरांना
कौटिल्य `तीक्ष्ण' अशी संज्ञा
वापरतो. `रसद' वर्गातील गुप्तहेर
राजाची छत्रचामरे धरून राजाच्या
पाठीमागे असत,
राजाधिकाऱयांच्या वर्तनावर लक्ष
ठेवणे, राजाच्या आचारी व
पाणक्यावर तसेच राजाच्या
शयनगृहात राजाचे बिछाने वगैरे
घालणाऱयांवर लक्ष ठेवणे हे
देखील `रसदां'चे काम असे.
तीक्ष्ण आणि रसद हे `सात्री' या
प्रवर्गातील असत.
गुप्तहेर खात्यात कौटिल्य
आणखी एक खास वर्गाचा
समावेश करतो, तो म्हणजे-
`परिव्राजिका वृत्तिकामा दरिद्रा
विधवा प्रगल्भा ब्राह्मण्यतपुरे कृत
सत्कारा महामात्रकुलान्
यधिगच्छेत्।' हा बहुधा ब्राह्मण
जातीच्या गरीब पण हुशार आणि
स्वकमाईवर चरितार्थ
चालविण्याची इच्छा असणाऱया
विधवांचा हा वर्ग असे; प्रसंगी
इतरही जातींच्या विधवांचा
समावेश केला जाई.
(क्रमश)