छायाचित्रण या कलाप्रकारात
श्रीकांत मलुष्टे सुमारे चार दशके
काम करीत आहेत. या प्रदीर्घ
वाटचालीत त्यांना पदोपदी
आलेले असंख्य अनुभव आणि
भेटलेली अगणित माणसे,
प्रसंगारुप घडत गेलेल्या घटनांच्या
मालिका खूप-काही सांगून
जाणाऱया आहेत. याच सगळ्या
गोष्टींमधून अनुभवकथन करताना
प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष बऱयाच
गोष्टींवर प्रकाश पडतो. याच
प्रकाशवाटेला मुक्तद्वार करून
देणारा श्रीकांत मलुष्टे यांचा
``अशा व्यक्ती अशा वल्ली'' हा
एकपात्री कार्यक्रम आहे. या
रंगमंचीय आविष्काराला जोड
लाभली आहे ती मलुष्टे यांनी
काढलेल्या छायाचित्रांची. या
कार्यक्रमात एकीकडे अनुभव
कथन होत असताना दुसरीकडे
दृश्यमाध्यमातून दुर्मिळ
छायाचित्रेही आहेत.
एखाद्या कार्यक्रमाचा शुभारंभ
सोहळा असो किंवा पारितोषिक
वितरण असो. सत्कार
स्वीकारताना कार्यक्रमाला
आमंत्रित करण्यात आलेले पाहुणे
आणि पारितोषिक स्वीकारताना
विजेते कसे वागतात? ते नेमके
काय करतात? याचे आद्यंत
कथन केले जात असतानाच तशा
घटनांची, तशा प्रसंगांची त्यांनी
टिपलेली छायाचित्रणे पडद्यावर
दिसायला लागतात तेव्हा तो क्षण
जसा घडला असावा तसाच
आपल्यासमोर उभा राहतो.
पंढरपूरच्या विठोबाच्या
दर्शनाला आषाढी एकादशीला
भक्तांचा महासागर लोटतो.
त्याची असंख्य दृश्ये आपण
दरवर्षी पाहतच असतो. या घटना
त्याच असल्या तरी दृश्यांमध्ये
मात्र प्रत्येकवेळी फरक असतो.
आता याच एकादशीला श्री
विठ्ठलाची पूजा होते आणि या
पूजेच्या निमित्ताने गेली चाळीस-
पन्नासवर्षे एकाच पद्धतीने फोटो
काढला जातो आणि तोच
सगळ्या दैनिकांमध्ये छापला
जातो. राज्यातल्या जनतेला सुखी
ठेव असे सांगणाऱयांचा फोटो
छापून येतो, त्यात विठोबा
बिच्चारा विटेवर उभा असतो
आणि त्याच्या आजुबाजूला उभे
असलेले फोटोसाठी कशी पोज
घेऊन उभे राहतात तो प्रसंग मलुष्टे
त्यांच्या शैलीदार आणि
ओघवत्या निवेदन-कथनाच्या
माध्यमातून आपल्यासमोर उभा
करतात. त्यामुळे विठ्ठलाबरोबर
इतरांचा फोटो आहे की
इतरांबरोबर विठ्ठल फोटोसाठी
विटेवर उभा राहिलाय हे कळत
नाही असा विचार अनेकांच्या
मनात येतो तसाच तो
मलुष्टेंसारख्या फोटोग्राफरच्याही
मनात आलेला असतो हे ाापल्या
लक्षात येते. अशा अनेक प्रसंगांची
मालिकाच आपल्याला या
कार्यक्रमात पाहायला आणि
ऐकायला मिळते. मलुष्टे यांच्या या
अनुभव कथनाच्या ओघात
अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, बुवाबाजी,
नवस आणि तंत्रमंत्र करायला
लावणारे, भविष्यकथन करणारे,
वास्तूशास्त्राचा उद्योग करणारे अशा
अनेकांमधल्या ढोंगबाजी करणा-
ऱयांवरही मलुष्टे टीकास्त्र सोडायला
विसरत नाहीत. अनेकांच्या
मनातल्या भावनांना या कार्यक्रमातून
अधोरेखित करण्यात आले आहे.
सुंदर फोटोंच्या दर्शनासह फोटोग्राफी
करतानाच्या गंमती-जंमती असे याचं
स्वरूप आहे.

ज्यांना फोटोग्राफी येत नाही
अशांना या शोमधून अप्रत्यक्ष
मार्गदर्शन तर होणार आहेच पण
त्याचबरोबर कॅमेऱयापेक्षा त्यातून
पाहणाऱयाचा डोळा आणि त्याचे
विचार कसे महत्त्वाचे असतात हे
आपल्या सहज लक्षात येईल.
आज कॅमेरा मागे पडलाय आणि
अनेकांच्या हातात मोबाईल
आलेत. आज मोबाईलवर
बोलण्याऐवजी त्यातल्या
कॅमेऱयाचाच उपयोग अधिक होत
असल्याचा अनेकांचा अनुभव
असेल. अशांना काही मोजक्या
गोष्टींमधून या कार्यक्रमात
मार्गदर्शनही मिळणार आहे.
गेली सुमारे तीन दशके
फोटोग्राफी शिकवणाऱया मलुष्टे
यांच्या असंख्य विद्यार्थी वर्गालाही
त्यांच्याकडून शिकताना ज्या गोष्टी
आणि अनुभव ऐकण्याची संधी
मिळालेली नसेल अशांसाठी
श्रीकांत मलुष्टे यांचा ``अशा
व्यक्ती अशा वल्ली'' हा एकपात्री
कार्यक्रम म्हणजे पर्वणी ठरावी.
आता श्रीकांत मलुष्टेंविषयी
थोडेसे ö श्रीकांत मलुष्टेचे वडील
गोपीनाथ मलुष्टे यांनी 1952 मध्ये
म्हणजे ज्या काळात फोटोग्राफीचे
तंत्र प्रगत नव्हते त्यावेळी
अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज
असलेला एक फोटो स्टुडिओ
रत्नागिरीमध्ये काढला होता.
आपला हाच व्यवसाय आणि
वारसा मुलाने पुढे चालवावा अशी
त्यांची इच्छा होती. पण, श्रीकांत
मलुष्टे झाले प्राध्यापक.
सोबतीलाच छंद म्हणून त्यांनी
नाट्यकला जोपासली. जवळजवळ
बारा वर्ष ते नाट्यक्षेत्रात
होते. राज्य नाट्यस्पर्धेतही त्यांनी
भाग घेतला आणि अभिनयाच्या
क्षेत्रात काम केले. व्यावसायिक
रंगभूमीवरही अनेकवर्ष त्यांचा
सराईतपणे वावर होता.
अभिनयाबरोबरच छायाचित्रण हा
कलाप्रकार त्यांनी जाणीवपूर्वक
जोपासला. 1973 पासून ते
छायाचित्रणकलेच्या क्षेत्रात
आहेत. सुरुवातीला छंद म्हणून
जोपासलेली छायाचित्रणाची कला
व्यवसायात कशी रूपांतरीत
झाली हे मलुष्टे यांनी स्वत:लाही
कळले नाही. मुंबईमध्ये तर
छायाचित्रण कलेचे रीतसर
प्रशिक्षण देण्याचे काम ते
आजतागायत करत आले
आहेत. महाराष्ट्रात अनेक
ठिकाणी त्यांनी आजवर
छायाचित्रण विषयक मार्गदर्शन
केले आहे. काळाबरोबर
फोटोग्राफीचे तंत्र बदलत गेल्याचे
गेल्या चाळीसेक वर्षात आपण
पाहतच आलो आहोत. हे बदल
मलुष्टे यांनी पाहिले, पचवले आणि
स्वत:मध्येही तसे बदल करवून
घेतले. काळाच्या बरोबर पाऊले
टाकण्याच्या त्यांच्या विलक्षण
क्षमतेमुळेच आज त्यांना हे यश
लाभले आहे. आज त्यांचा
विद्यार्थी परिवार काही हजारांहून
अधिक आहे. श्रीकांत मलुष्टे
यांनी काढलेल्या छायाचित्रांची
पाच प्रदर्शने मुंबईत आयोजित
केली गेली आहेत. फोटोग्राफीच्या
अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन
त्यांनी अनेक पारितोषिकेही
पटकावली आहेत. फोटोग्राफी
विषयक संस्थामध्ये पदाधिकारी
म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे काम
केले आहे. मुंबईतल्या विविध
दैनिकांमधून त्यांनी
छायाचित्रणविषयक स्तंभलेखनही
केले आहे. `छंद छायाचित्रणाचा'
नावाचे एक पुस्तकही त्यांनी
लिहिले आहे. सदर पुस्तकाला
कोकण मराठी साहित्य परिषदेचा
पुरस्कारही लाभला आहे.