देशात भ्रष्टाचाराच्याविरुद्ध रान
उठावे आणि त्याचवेळी `अश्रूची
झाली फुले' सारखे नाटक
रंगभूमीवर यावे ही एक
योगायोगाची गोष्ट आहे. अत्यंत
प्रामाणिक माणसाची कशी फरफट
होते हे या नाटकात प्रा. वसंत
कानेटकर यांनी समर्थपणे मांडली
आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात
होणारी सामान्यांची गळचेपी,
गुंडगिरीविरुद्ध आवाज
उठविणाऱया व्यक्तींची होणारी
मुस्कटदाबी यांचे विदारक चित्र या
नाटकात प्रकर्षाने दिसते.
हे नाटक जेव्हा रंगमंचावर आले
तेव्हा त्याचे 1966 पासून 2002
पर्यंत `नाट्यसंपदे'ने 1111 प्रयोग
केले. त्यात कॉलेजच्या प्राचार्यांची
भूमिका प्रभाकर पणशीकरांनी
केली होती तर काशिनाथ घाणेकर
यांनी लाल्याची भूमिका केली
होती. पणशीकरांचे या नाटकावर
फार प्रेम होते. ते पुन्हा रंगभूमीवर
यावे अशी त्यांची तीव्र इच्छा होती.
त्यांचे शिष्यमित्र अशोक समेळ
यांनी पंतांना दिलेली श्रद्धांजली
समजून पुनश्च ते रंगभूमीवर
आपल्या `ऋग्वेद' या संस्थेतर्फे
आणून त्यांची इच्छा पूर्ण केली
आहे. त्यांनी या नाटकात शंभू
महादेवाची भूमिका 452 प्रयोगात
केली होती. प्रस्तुतच्या नाटकाचे
दिग्दर्शनही त्यांनीच चोखपणे केले
आहे.
नाटकात डॉ. विद्यानंद हे
कॉलेजचे प्राचार्य असून त्यांची पत्नी
सुमित्रा डॉक्टर आहे. शंभू महादेव
हा त्यांचा जुना मित्र. अभ्यासात
मागे पण इतर भानगडी करणारा,
नीलम त्याची गैरधंद्यातली
भागीदार आणि सर्व काही. श्याम
विद्यानंदाचा विद्यार्थी त्यांच्या घरात
राहणारा. तो कॉलेजात प्राध्यापक
आहे. विद्यानंदांचे कॉलेजातील
सहकारी प्रा. तात्या आरोळे, प्रा.
क्षीरसागर हे कॉलेजचे सर्वेसर्वा
शेठ धर्माप्पा यांचे चमचे.
विद्यानंदाचा एकुलता एक मुलगा
अपघातात गेलेला. म्हणून श्यामवर
ते खूप प्रेम करतात, अगदी
मुलासारखेच. कॉलेजचा विद्यार्थी
लाल्या धर्माप्पा शेठच्या मुलाला
चाकू दाखवतो. धर्माप्पाला हे सहन
होत नाही. लाल्याला घेऊन ते
विद्यानंदाकडे येतात व त्याला
कॉलेजमधून काढून टाकण्याची
मागणी करतात. विद्यानंदांना ते
पटत नाही. चौकशी करून निर्णय
घेऊ असे ते म्हणतात. धर्माप्पा
वजन वापरून लाल्याला अटक
करवितात. विद्यानंद त्यांच्याशी वैर
घेऊन लाल्याला सुधारतात.
कॉलेजचे सर्वेसर्वा असलेल्या
धर्माप्पाला आपला हा अपमान
सहन होत नाही. कॉलेजातील
रकमेची अफरातफर इत्यादी
आरोप ठेवल्याने विद्यानंदांना
तुरुंगात जावे लागते. कॉलेजचा
एक चांगला प्राचार्य शिक्षा भोगून
बाहेर पडल्यावर अट्टल गुन्हेगार
बनून बाहेर पडतो. तर त्याचवेळी
त्यांचा गुंड विद्यार्थी लाल्या
विद्यानंदांमुळे सी.आय.डी.
इन्स्पेक्टर बनतो. त्यामुळे
नाटकाला जबरदस्त वळण
मिळते. विद्यानंद आंतरराष्ट्रीय
गुन्हेगार झालेला असतो. अशा
तऱहेने नाटकात प्रचंड विरोधाभास
निर्माण होतो. धक्कातंत्राने नाटक
संपते.
नाटककार प्रा. वसंत कानेटकर
यांनी नाटकाची बांधणी
आकर्षकरीत्या केली असून
प्रस्थापित शिक्षण सम्राटांचे बुरखे
फाडले असल्यामुळे नाटकात
टाळ्यांचा कडकडाट होतो.
प्रस्तुतचे निर्माते दिग्दर्शक अशोक
समेळ आपल्या नाट्यगुरुची
कलाकृती तिला कुठेही धक्का न
लावता स्वत दिग्दर्शन व
भूमिकाही करून नवीन
कलाकारांकडून चोखपणे बसवून
घेतली आहे.
अशोक समेळ या नाटकात
पूर्वीप्रमाणेच शंभू महादेवाची
भूमिका करतात. विद्यानंदांना साथ
देणारा त्यांचा सच्चा मित्र सादर
करतात. त्यांच्या दु:खानेही व्यथीत
होतात. नटश्रेष्ठ प्रभाकर
पणशीकरांनी अजरामर केलेली
विद्यानंदाची भूमिका शिरीष घाग
यांनी विशेष मेहनत घेऊन सादर
केली आहे. विद्यानंदांच्या
भूमिकेतील सर्व छटा त्यांनी
यथार्थपणे व्यक्त केल्या आहेत.
उदय सबनीस यांचा धर्माप्पा चोख
आहे. पूर्वीच्या नाटकात अभिनेत्री
फैयाज नीलमची भूमिका करीत
होत्या, त्या आता या नाटकात
सुमित्रेची भूमिका करीत असून
पतीवर प्रेम करणारी, त्यांना
सांभाळणारी पत्नी आणि नंतर
तिची झालेली हतबलता फैयाज
हिने यथार्थ साकार केली आहे.
लाल्याची महत्त्वाची भूमिका
संग्राम समेळ याने रुबाबदारपणे पेश
केली असून, त्याची गुंड, अरेरावी
प्रवृत्ती आणि नंतर विद्यानंदासमोर
दाखविलेली नम्रता उल्लेखनीय
आहे. निस्पृह, कर्तव्यदक्ष
अधिकारी भावनावश होतो, पण
कर्तव्यात चुकत नाही. आवाजाची
विलक्षण चढउतार व उत्कृष्ट
संवादफेक हे त्याच्या अभिनयाचे
खास वैशिष्ट्य. निखिल जोशी
(तात्या आरोळे), महेश सुभेदार
(क्षीरसागर), निखिल मालप
(श्याम), नयन पाटील (इन्स्पेक्टर)
यांनी आपल्या भूमिका चोख केल्या
आहेत.
बाबा पार्सेकर यांनी
विमानतळासह भव्य सेट
उभारलेला असून दिमाखदार
नेपथ्य हे त्याचे वैशिष्ट्य आहे. राजन
ताम्हाणे (प्रकाशयोजना), ऋषी
शहा (पार्श्वसंगीत), रमेश बने
(वेशभूषा) इत्यादी तांत्रिक अंगे
चोख झाली आहेत.
संग्रामसारखा अभिनयाचा
जबरदस्त जाण असलेला
कलाकार त्यांना लाभला
असल्याने त्याची भूमिका आणि
कानेटकरांचे संवाद यामुळे नाटक
पुनप्रत्ययाचा आनंद देते. कथा,
खटकेबाज संवाद, उत्कृष्ट
दिग्दर्शन आणि कलाकाराचा
अभिनय या सर्व गोष्टी चोखपणे
जमून आल्यामुळे नाटक जबरदस्त
पकड घेते.