प्रख्यात पार्श्वगायिका बेला शेंडे यांच्या आठ नव्या गीतांचा ‘धुंद क्षण’ नावाचा एक म्युझिक अल्बम लवकरच येतोय. या अल्बमची खास बात अशी की, यातल्या गीतांना एक नव्हे तर आजच्या काळातल्या चार उत्कृष्ट संगीतकारांनी संगीत दिले आहे. त्यात ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी संगीत दिलेली गाणी तर आहेतच शिवाय त्यांच्याबरोबर मिथिलेश पाटणकर, नीलेश मोहरीर आणि अविनाश-विश्वजीत यांनीही संगीत दिलेली प्रत्येक दोन गीते ‘धुंद क्षण’ या अल्बममध्ये आहेत.
गेली पंच्याऎंशी वर्ष संगीतवाद्य निर्माते असा लौकिक असलेल्या हरिभाऊ विश्वनाथ कंपनी यांनी ‘धुंद क्षण’ हा अल्बम प्रस्तुत केला आहे. हरिभाऊ विश्वनाथ कंपनीचे गेल्याचवर्षी सारेगमपच्या आठ लिटल चॅम्प्सन घेऊन आठवा स्वर नावाचा अल्बम प्रकाशित केला. ‘धुंद क्षण’ या अल्बमची निर्मिती-संकल्पना उदय दिवाणे यांची असून युनिव्हर्सल म्युझिक इंडिया लि. ही कंपनी या अल्बमचे मार्केटींग करत आहेत.

‘धुंद क्षण’ मधली काही गाणी इंडियन आणि काही गाणी वेस्टर्न आहेत. यात सुरेश भटांची एक गझलही आहे. या अल्बममधल्या गीतांचा तपशील - १) रंगी तुझ्या अशी रंगले श्वास माझे तुझे एक होती जसे हे गीत मिलिंद जोशी यांनी लिहिले असून संगीतकार आहेत अविनाश-विश्वतीत. २) झिम्माड सर निघाली वादळवा-यासवे हे गीत अश्विनी शेंडे हिने लिहिले असून या गीताला नीलेश मोहरीर यांनी संगीत दिले आहे. ३) राधा दिवाणी रे हे गीत अश्विनी शेंडे हिने लिहिले असून अशोक पत्की यांनी ते संगीतबद्ध केले आहे. ४) खुलते अशी मी आठवता कुणी हे गीत चंद्रशेखर सानेकर यांनी लिहिले असून या गीताला मिथिलेश पाटणकर यांनी संगीत दिले आहे. ५) मी एकटीच माझी असते कधीकधी ही सुरेश भटांची गजल असून मिथिलेश पाटणकर यांनी ती संगीतबद्ध केली आहे. ६) अल्लड या लाटांनी रिमझिमत्या थेंबांनी हे गीत श्रीरंग गोडबोले यांनी लिहिले असून ह्या गीताला अविनाश-विश्वजीत यांचे संगीत आहे. ७) ओल्या ओल्या देहावर हे गीत अश्विनी शेंडे हिने लिहिले असून अशोक पत्की यांचे संगीत आहे.८) देही श्रावण सरतो गं, मनात पाऊस उरतो गं हे गीत अश्विनी शेंडे हिने लिहिले असून याला नीलेश मोहरीर यांनी संगीत दिले आहे.