लेखक व वाणीचे सम्राट आचार्य अत्रे
Untitled Document
लेखक व वाणीचे सम्राट आचार्य अत्रे
(1)

लेखक व वाणीचे सम्राट आचार्य अत्रे

  106 हुतात्म्यांच्या बलिदानातून, असंख्यांच्या त्यागातून, सेनापती बापट, एस.एम.जोशी, कॉ. डांगे यांच्यासारख्या समर्थ नेत्यांच्या तेजस्वी लढय़ातून महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. परंतु या नेत्यांनी उभ्या केलेल्या आंदोलनाला विराट स्वरूप प्राप्त झाले ते केवळ आचार्य अत्रे यांच्यामुळे! ‘लेखणी व वाणी यांचे सम्राट’ असे त्यांचे यथार्थ वर्णन महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांनी एकदा केले, त्याची प्रचीती संयुक्त महाराष्ट्र लढय़ात आचार्य अत्रे यांनी ‘मराठा’ दैनिकाची रणभेरी वाजविली तेव्हा आली. जगातील वृत्तपत्रे, कुणाच्या तरी आधी डोक्यात व मग छापखान्यात जन्माला येतात. ‘मराठा’ दैनिक रणांगणावर, लोकसमुदायात जन्माला आले. दादरच्या शिवतीर्थावर, मुंबई-सह महाराष्ट्र झाला पाहिजे या मागणीसाठी प्रचंड सभा भरली. आचार्य अत्र्यांसह अनेक नेते तुरुंगातून नुकतेच सुटून आलेले होते. त्या ठिकाणी, महाराष्ट्रनिर्मितीच्या या लढय़ात आंदोलकांना साथ देण्यासाठी स्वतंत्र, अस्सल मऱहाठी बाण्याचे दैनिक हवे असा प्रश्न निघाला. लोक उठून उभे राहिले व तुम्ही दैनिक सुरू करा, असा त्यांनी आचार्य अत्रे यांना आदेश दिला. तेव्हा अत्रे म्हणाले, ‘‘तुम्ही साऱया मराठी बांधवांचा आदेश शिरसावंद्य मानून संयुक्त महारराष्ट्राच्या लढय़ाचा आवाज उठविणारे दैनिक काढण्याचे मी जाहीर करीत आहे!’’ टाळ्यांचा कडकडाट झाला.

  त्या वेळी अत्र्यांच्या बँक खात्यात 66 रुपये होते. अत्र्यांनी घोषणा केली परंतु तसे ते गाफील नव्हते. टाळ्या थांबल्यावर अत्रे म्हणाले, ‘‘लोकहो, पण दैनिक काढायला पैसा लागतो. वर उचललेले हात तुमच्या खिशात घाला व जितके पैसे असतील ते वृत्रपत्रासाठी द्या!’’ तिथल्या तिथे पैसे जमायला सुरुवात झाली व पुढे लोकांनी ‘मराठी’ दैनिकाच्या रोटरी मशीनसाठी 40 हजार रुपये जमा करून दिले. जगाच्या इतिहासात असे घडले नसेल. लोकशाहीत लोक सरकार निवडून देतात. पण निवडून दिलेल्या त्या सरकारने लोकांवर अन्याय केला की त्या सरकारलाच धडा शिकविण्यासाठी लोक वृत्तपत्र काढून देतात असे प्रथमच घडले. वायुपुत्र हनुमानाने एकदम सूर्य पकडण्यासाठी झेप घ्यावी तसे ‘मराठी’ दैनिकाबाबत घडले. ‘संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे’, या घोषणेत ‘च’ आणला तो आचार्य अत्रे यांऩी म्हणूनच ‘च’ चा आग्रह कशाला अस म्हणणाऱया यशवंतराव चव्हाणांना आपल्या नावातील ‘च’ काढून टाकला तर काय होईल ते पाहा असे सुनावले ते आचार्य अत्रे यांनी. महाराष्ट्राची सारी अस्मिता आचार्य अत्रे यांच्या रूपाने त्या वेळी उभी राहिली.

   शिक्षक अत्रे लोकांनी पाहिले होते. ‘झेंडूची फुले’ लिहिणारे कवी अत्रे महाराष्ट्राला माहीत होते. नाटककार अत्रे व चित्रपटनिर्माते अत्रे लोकप्रिय होते. परंतु पत्रकार अत्रे यांचे हे दर्शन मराठी जनतेला नवे होते. शब्दांना स्टेनगनच्या गोळ्यांची ताकद असू शकते व विरोधक नामोहरम होऊ शकतात हे अत्रे यांनीच आपल्या परखड लेखांनी दाखवून दिले. आचार्य अत्रे यांच्या ‘मराठी’ रूपी मुलुखमैदान तोफेने शत्रुपक्षाची अक्षरश: दाणादाण उडविली. एका झुंझार, तडफदार, पूर्णपणे निर्भय अशा संपादकाचे महाराष्ट्राला दर्शन घडले. दि. 15 नोव्हेंबर 1956 रोजी जेव्हा ‘मराठा’ दैनिक सुरू झाले तेव्हा ‘मराठा शिलंगणाला बाहेर पडला’ या शब्दांत त्याचे स्वागत झाले. मुहूर्ताचा पहिला अंक लालजी पेंडसे यांनी विकला व सेनापती बापट यांनी तो विकत घेतला. त्या वेळी सेनापती बापटांनी अत्र्यांना आशिर्वाद दिला व तो देताना जे उद्गार काढले, त्यांत आचार्य अत्रे यांचे मोठे पण समर्पक शब्दांत व्यक्त झाले. सेनापती बापट म्हणाले, ‘‘तुमच्या मराठेपणावर माझा विश्वास आहे. अन्यायाची चीड आणि न्यायाची पराकोटीची चाड हे खरे मराठीपण आहे!’’

AddThis Social Bookmark Button