देविशा फिल्म्सची निर्मिती असलेला ‘देऊळ’ हा मराठी चित्रपट येत्या २३ सप्टेंबर २०११ रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. प्रसिद्ध उद्योगपती अभिजित घोलप हे या चित्रपटाचे निर्माते असून उमेश कुलकर्णी यांनी दिग्दर्शन केलं आहे तर गिरीश कुलकर्णी यांचं संवादलेखन आहे. ‘वळू’ आणि ‘विहिर’ असे दोन यशस्वी चित्रपट दिलेल्या तसेच सर्व थरातून गौर व झालेल्या लेखक-दिग्दर्शक व्दयीचा हा तिसरा चित्रपट आहे.

२०११ मधला आणखी एक बिग बजेट मराठी चित्रपट एवढ्याच संकुचित दृष्टीकोणातून आपण या चित्रपटाकडे पाहत नाही, उलट मराठी चित्रपटाचे आजवर कधीही झाले नव्हते अशा प्रकारे भव्य प्रमाणात ‘देऊळ’ या चित्रपटाचे प्रदर्शन महाराष्ट्रात सर्वत्र एकाचवेळी करण्याचे आपण ठरवले आहे असे निर्माते अभिजित घोलप यांनी सांगितले. मराठी चित्रपटही हिंदी चित्रपटाच्या तोडीचा असतो एवढेच नाही तर दाक्षिणात्य चित्रपटांसारखाच भुरळ पडून मोहित व्हावे असाही मराठी चित्रपट असतो. याशिवाय मराठी चित्रपटाला उत्तम कथानकाचा मजबूत पायाही असतो हे ‘देऊळ’ पाहून सगळ्यांच्या लक्षात येईल असे सांगून आपण ‘देऊळ’ च्या निर्मितीमूल्यांमध्ये अजिबात तडजोड केलेली नाही असेही घोलप यांनी स्पष्ट केले.
या चित्रपटाचे खास आकर्षण म्हणजे या चित्रपटातील स्टारकास्ट.. यात नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर, मोहन आगाशे, गिरीश कुलकर्णी, उषा नाडकर्णी, ज्योती सुभाष, किशोर कदम, आतिशा नाईक, विभावरी देशपांडे, ऋषिकेश जोशी आदी कलाकार आहेत. शिवाय ज्येष्ठ अभिनेते नसिरूद्दीन शहा हे छोट्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची गीते स्वानंद किरकिरे यांनी लिहीले असून प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी चित्रपटातील गीतांसाठी सेट्स उभे केले आहेत. ‘देऊळ’चे दमदार कथानक पाहून दोन हजार अकरा मधला लक्षवेधी चित्रपट म्हणुन रॉटरडॅम चित्रपट महोत्सवात देऊळ ला गौरवण्यात आले असल्याने ज्याच्या प्रदर्शनाकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत असा या वर्षातला ‘देऊळ’ हा महत्वाचा चित्रपट आहे.