गेल्या पाच महिन्यांपासून पुरत्या महाराष्ट्राला वेड लावणा-या झी मराठीवरील ’मराठी पाऊल पडते पुढे’ या कार्यक्रमाच्या महाअंतिम फेरीत मुंबईचे मिहीर खेडेकर आणि ऋतुरा्ज शिरोड्कर हे मल्लखांब कारागिर विजयी झाले आहेत. या दोन्ही कलाकारांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते प्रथम बक्षीस विभागून देण्यात आले.
या महाअंतिम सोहळ्यात सत्तर वर्षांचे राजूबाबा शेख यांना अभिनेते रमेश देव आणि सीमा देव यांच्या हस्ते तर तीन वर्षाचा सोहम गोराणे याला अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या हस्ते विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील अभिजात कला-गुणांना आणि कलाकारांना जगासमोर आणता यावे, यासाठी या कार्यक्रमाची निर्मिती प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी केली होती. आणि या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळाला. या महाअंतिम फेरीचे प्रक्षेपण रविवारी ५ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजता झी मराठीवर प्रसारीत होणार आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून घेऊन आलेल्या ५६ कलाकारांच्या साथीनं सुरू झालेल्या कार्यक्रमात अंतिम फेरीत एकूण आठ कलावंतानी आपली कला सादर केली. या महाअंतिम फेरीत विजेत्या ठरलेल्या कलावंताना झी मराठीकडून मानचिन्ह आणि दोन लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला. तर चार उपविजेत्यांना प्रत्येकी एक लाख रूपये आणि मानचिन्ह देण्यात आले. तसेच ७० वर्षाचे राजूबाबा शेख आणि तीन वर्षाचा कलावंत सोहम गोराणे या दोघांना विशेष पुरस्कार देण्यात आले. या प्रत्येकी एक लाख रूपये आणि मानचिन्ह आहे.
या कार्यक्रमाचे मान्यवर परीक्षक हिंदी, मराठी चित्रपट आणि रंगमंचावर प्रसिद्ध असलेले मकरंद देशपांडे आणि अभिनेत्री मुग्धा गोडसे यांनी या बहुरंगी कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली तर सूत्रसंचालक अभिनेता जितेंद्र जोशी यांनेही उत्तम सूत्रसंचालन केले.