सध्या मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच मराठी रंगभूमीलाही चांगले दिवस आल्याचं दिसून येतं. अनेक जुन्या नाटकांना परत रंगभूमीवर आणलं जातय. आणि त्याला नाट्यरसिकांचाही चांगला प्रतिसाद मिळतोय. अनेक निर्मिती संस्था नव्या संचासोबत या नाटकांची पुन्हा निर्मिती करत आहे. जुन्या नाटकांसोबतच रंगभूमीवर मोठ्या जोशात काम करणा-या तरूण कलाकारांनीही वेगळ्या विषयावर आधारीत नाटकांची निर्मिती केली आहे. त्यांनाही भरभरून प्रतिसाद मिळतोय. गाजलेल्या नाटकांबरोबरच मराठी रंगभूमीवरील अनेक दिग्गज पुन्हा रंगभूमीकडे वळतांना दिसून येत आहेत. ज्येष्ठ अभिनेता विक्रम गोखले, अभिनेत्री रीमा लागू यांच्यानंतर आता प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर हेही लवकरच रसिकांना रंगभूमीवर पहायला मिळणार आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या जी तरूण दिग्दर्शक, लेखकांची पिढी आहे ती अत्यंत प्रभावी आणि प्रयोगशिल वृत्तीने नवनवीन प्रयोग करीत आहेत. तरूणांना डोळ्यांसमोर ठेवून विषयांची निवड केली जात असल्याने तरूण वर्गातही नाटकांची आवड वाढतांना दिसून येते आहे. आपल्या करीअरची सुरवात रंगभूमीवरून केलेले अनेक कलाकार हे एकदा चित्रपटात काम करायला लागले की परत रंगभूमीकडे पाठ फिरवतांना दिसतात. आणि मग चांगल्या विषयांची उणीव असल्याची कारणे देऊ लागतात. अशा टीका अनेकदा केल्या जातात. मात्र सध्या चित्र पालटलं आहे. अनेक तरूण मंडळी नवनवीन आणि चालू घडामोडींवरील विषयांवर नाटकांची निर्मिती करत आहेत. याला प्रेक्षकांबरोबरच दिग्गज कलाकारांचाही प्रतिसाद मिळतोय.
जुन्या गाजलेल्या नाटकांना नव्याने नव्या दमाच्या प्रतिभावंत कलाकारांसोबत घेऊन येण्यात प्रशांत दामले फॅन फांऊन्डेशन, सुनील बर्वे यांचा हर्बेरीअम उपक्रम ह्या प्रमुख निर्मिती संस्थाचा उल्लेख करता येईल. हर्बेरीअम अंतर्गत आतापर्यंत ‘सूर्याची पिल्ले’, ‘लहानपण देगा देवा’ आणि ‘हमिदाबाईची कोठी’ ह्या दर्जेदार कलाकृती रंगभूमीवर आणण्यात आल्या आहेत. आणि रसिकांनी त्यांना चांगलेच डोक्यावर घेतले आहे. जुन्या नाटकांना मिळणारा प्रतिसाद पाहून की काय़? रंगभूमीपासून बराच काळ दूर असलेले कलाकार परत एकदा रंगभूकीकडे वळतांना दिसत आहेत. विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, रीमा लागू यांच्यानंतर आता प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर हे ‘झिपरू’ या नाटकातून परत एकदा रंगभूमीवर दिसणार आहेत.
नानांनी ‘पाहिजे जातीचे’ या विजय तेंडुलकर लिखित नाटकाने रंगभूमीवर पदार्पण केले. त्यानंतर नाना पाटेकर नाव हे नाट्यक्षेत्रात गाजू लागलं होतं. त्यानंतर त्यांनी ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या सानिध्यात अनेक दर्जेदार कलाकृतींमध्ये आपली छाप सोडली. त्यात ‘महासागर’, ‘हमिदाबाईची कोठी’ आणि ‘पुरूष’ या नाटकांचा उल्लेख करता येईल. ‘पुरूष’ या नाटकातील त्यांची ‘गुलाबराव’ ची भूमिका तर त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात गाजलेली भूमिका ठरली. मात्र याच व्यक्तिरेखेला मिळालेल्या लोकप्रियतेला पाहून नाना चिंतीत झाले होते. त्यामुळे त्यांनी रंगभूमीकडे पाठ फिरविली होती. मात्र त्यानंतर ते परत ‘आई शप्पत’ आणि ‘तनमाजोरी’ या नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. आता परत नाना नाटक करणार असल्याच्या बातमीने त्यांचे चाहते चांगलेच आनंदीत झाले असून ते या नाटकाची आतुरतेने वाट पाहत आहेत.