राजेश शृंगारपुरे या हिंदी-मराठी चित्रपटात विविध भूमिकांमध्ये चमकणा-या मराठी अभिनेत्याने आपल्या अभिनयाने सिने इंण्डस्ट्रीमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मालिका, चित्रपटात त्यांनी साकारलेल्या अनेक व्यक्तिरेखा लक्षवेधी ठरल्या, याच पंक्तीत दाखल होणा-या एका आव्हानात्मक भूमिकेत राजेश शृंगारपुरे लवकरच आपल्याला दिसणार आहेत. रईस लष्करिया प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या ‘स्वराज्य..मराठी पाऊल पडते पुढे’ या चित्रपटात राजेश शृंगारपुरे, राम पाठारे या तडफदार तरूणाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे.
चित्रपटाच्या शिर्षकावरूनच या चित्रपटाच्या विषयाचे वेगळेपण अधोरेखित होते. मराठी माणसाच्या नि:स्वार्थी मानसिकतेचा उठविला जात असलेला, गैरफायदा, मराठी माणसांमधला न्यूनगंड आणि सद्याच्या स्पर्धात्मक युगासाठी मराठी तरुणांकडून अपेक्षित असलेली मोर्चेबांधणी या सा-यांचा उहापोह ‘स्वराज्य..मराठी पाऊल पडते पुढे’ या चित्रपटात केला गेला आहे. सादीक लष्करिया यांची सहनिर्मिती असलेल्या या चित्रपटाव्दारे विशाल-विहार ही नवी जोडी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करीत आहे.
या चित्रपटाच्या चित्रीकरणावर आणि त्यातील व्यक्तिरेखांवर विशेष मेहनत घेण्यात आली असून राम पाठारे या सशक्त व जिगरबाज तरूणाची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी राजेश शृंगारपुरे यांनी सिक्स पॅक बॉडी कमावली आहे. त्यांचा हा नवा लुक ‘स्वराज्य..मराठी पाऊल पडते पुढे’ या चित्रपटासाठी एक आकर्षण ठरणार आहे. हिंदीच्या तोडीस तोड अॅकक्शन दृश्य यात पहायला मिळणार आहे. राजेश शृंगारपुरे यांच्यासह अरूण नलावडे, अंशुमन विचारे, इला भाटे, निर्मला कोटणीस, नम्रता गायकवाड, हेमांगी कवी, किरण माने, वर्षा दांदले, सुश्रृत मंकणी, राजन बने, जयंत पाटेकर यांच्या भूमिका असून हिंदी कलावंत दर्शन जरीवाला या चित्रपटातून एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.