मराठी इतिहास तसा प्रत्येक व्यक्ती शाळेत पुस्तकातून शिकत असतोच, त्यात शिवाजी महाराजांचा इतिहास, तानाची मालुसरेंचा इतिहास, राणी लक्ष्मीबाईचा इतिहास आदी शूर वीरांचा इतिहास पुस्तकात वाचत असतो. मात्र आता हाच इतिहास तुम्हाला व्हिज्युअलमध्ये पहायला मिळाला तर कसं वाटेल....? एकच नंबर ना...! हो खरंय....! आता वीर बाजीप्रभु देशपांडे यांचा धगधगता इतिहास जगभरातील प्रेक्षकांना मराठी आणि इंग्रजी भाषेत पहायला मिळणार आहे. व्हिज्युअलच्या माध्यमातून मराठी वीराचा उलगडला जाणारा हा पहिलाच चित्रपट रूपेरी पडद्यावर रंगवला जाणार आहे.
‘वीर बाजीप्रभु देशपांडे’ या ऎतिहासिक व्हिजुअल चित्रपटाची निर्मिती सनद माने यांनी केली असून शैलेश निळे या तरूणाची ही संकल्पना आहे. बाजीप्रभूंनी पावनखिंड कशी लढवली हे प्रत्यक्षात प्रेक्षकांना पाहता यावं, यासाठी या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. शिवाय जगभरातल्या लोकांना मराठी माणसाचा प्रगल्भ इतिहास कळावा यासाठी या चित्रपटाचं चित्रीकरण मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये केलं जाणार आहे. तसेच बाजीप्रभूंचं व्यक्तीमत्व तसंच्या तसं प्रेक्षकांसमोर यावं यासाठी गेल्या तीन वर्षांपासून बाजीप्रभूंचा अभ्यास करण्यात शैलेश निळे व्यस्त आहे. त्याचं म्हणणं हेच ठरलं की, पुस्तकात दडलेल्या इतिहासाचा जिवंतपणा लोकांना कळावा. त्यावेळचे लोक कसे होते, त्यांचं जगणं कसं होतं.
त्यांचे पेहराव कसे होते. शिवाय बाजीप्रभूंचं व्यक्तीमत्व प्रत्यक्षात कसं होतं. हेच रूपेरी पडद्याच्या माध्यमातून लोकांसमोर यायला हवं.
या फिल्मची एक आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटाचं शूटींग टूडी मध्ये केलं जाणार आहे. मात्र प्रत्यक्षात पडद्यावर तो प्रेक्षकांना थ्रीडीमध्ये पाहता येणार आहे. त्यामुळे बाजीप्रभूंचा जिवंत इतिहास आपल्यासमोर अधिक रंजकतेने उभा राहणार आहे. प्रेक्षकांना या चित्रपटात जिंवतपणा जाणवावा यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
Comments