डॉ.मीना नेरूरकर लिखीत ‘मी आणि माझा गोतावळा’
डॉ.मीना नेरूरकर लिखीत ‘मी आणि माझा गोतावळा’

- अमीत इंगोले
( This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it )

  डॉ.मीना नेरूरकर या लेखिका नाट्यरसिकांच्या चांगल्याच परिचीत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत अनेक दर्जेदार नाट्यकृतींचं लेखन केलं आहे. लेखिका होण्याआधी त्या एक उत्तम नृत्यकालाकार आहेत. सोबतच अभिनय सुद्धा करतात. एकंदर सांगायचं काय तर नॄत्य, अभिनय, लेखन आणि दिग्दर्शन असं त्यांचं बहुरंगी व्यक्तीमत्व आहे. बीएमएमच्या शिकागो अधिवेशनात अमेरिकेतूनही उत्तम कार्यक्रम सादर केले जाणार असून त्यातीलच एक म्हणजे पु.लं.च्या लेखांवर आधारीत ‘मी आणि माझा गोतावळा’ नाटक. या नाटकाचं लेखन डॉ.मीना नेरूरकर यांनीच केलं आहे. या नाटकाच्या संकल्पनेविषयी आणि त्यांच्या आत्तापर्यंतच्या कारर्किर्दीचा आढावा घेण्यासाठी तसेच सध्याच्या रंगभूमीविषयी त्यांचे मत जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी साधलेला संवाद...

   * पु.लं.च्या अपरिचीत लेखांवरील कार्यक्रमाच्या संकल्पनेबद्द्ल काय सांगाल?

   - ही कल्पना माझी नव्हती. मराठी रंगभूमीवरचे प्रख्यात दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांना मी लिहीलेले ‘अवघा रंग एकची’ झाला हे नाटक खूप आवडले होते, म्हणून मागच्या वर्षी अमेरिकेत आल्या आल्या त्यांनी मला फोन केला होता. मी देखील त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम माझ्या घरी ठेवला होता. मुलाखतीच्या शेवटी त्यांनी मला सांगितलं की, पु.लं.च्या काही लेखांवर एखादे नाटक लिहीले तर ते लोकांना आवडेल. लागलीच BMM Convention येतंच होतं म्हणून मी विचार केला की, त्यातच का नको हे नाटक सादर करायला. शिकागो अधिवेशनाच्या समितीने त्या कल्पनेला होकार दिला. व मी नाटक लिहायला बसले. खूप लेख वाचले आणि जरा वेगळ्या अमेरिकेतील प्रेक्षकांना आवडतील असे जरा वेगळे लेख निवडले. शिवाय पु.लं.च्या लिखाणावर बेतलेल्या नाटकात अतुल परचुरे हा त्यांची हुकमी भूमिका करतो आहे ह्या दोनच गोष्टी पुरेशा आहेत.

   * या नाटकाचं वैशिष्ट्य काय असणार आहे?

   - मला सगळ्या प्रसंगांची केलेली भूमिका गुंफण वेगळी असणार आहे. तसेच नाटकाच्या सुरवातीची नांदी व शेवट करण्यासाठी लिहीलेली दोन्ही गाणी व त्याचे सादरीकरण वेगळे असणार आहे. तसंच प्रत्येक प्रवेशाच्या अखेरीस जे खास वळण दिले आहे ते देखील प्रेक्षकांना आवडणार आहे.

   * यासाठी केलेल्या लेखनाचा अनुभव कसा होता? लेखन करतांना काही अडचणी ?

   - खूपच छान. त्यानिमित्ताने मला पु.लं.चे अनेक लेख वाचायला मिळाले. व त्याच्या हरहुन्नरी प्रतिभेचा पुन्हा एकदा तुडुंब आस्वाद घेता आला. दोन महिने पुलंमय पुलंकित व्हायची संधी मिळाली. अडचणी तशा काहीच नाही. मात्र मधेमधे काही शब्द घालतांना मात्र शालजोडीला ठिगळ लागेल अशी भीती वाटत होती. पण तसे केल्याशिवाय पर्याय नव्हता. या नाटकात असणा-या १४ पात्रांनाही कथानकात न्याय देण्यासाठी मी लेख निवडतांनाच तशी काळजी घेतली. बीएमएमला एका दोघा पात्रांच्या नाटकांपेक्षा अधिक पात्रे असली तर जास्त भावते. म्हणून लेख निवडतांनाच असे निवडले की, प्रत्येक पात्रांचे वेगळेपण लक्षात येईल व न्याय मिळेल.

   * दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर आणि अभिनेता अतुल परचुरेबद्दल काय सांगाल?

   - अतुलबद्दल मी अजून काय सांगणार. सगळ्यांना त्याचे काम माहितंच आहे. माझ्या मते पुलंच्या भूमिकेला त्याच्यासारखा फिट दिसणारा, यथार्थ न्याय देणारा नट नसेल. आमच्या नाटकाचे आणि बीएमएमच्या प्रेक्षकांचे भाग्य की स्र्किप्ट लिहून झाले नव्हते. पण त्याला विचारल्यावर तो लगेच हो म्हणाला कारण त्यालाही ’पुलं’ करायला खूप आवडतात. आणि दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर हे खूप अनुभवी दिग्दर्शक आहेत. आजवर विविध नाटकांचे ८०००वर प्रयोग त्यांच्या नावावर आहेत. इतर गाजलेल्या दिग्दर्शकांच्या नाटकांचे आजवर ४००० प्रयोग असतील नसतील. म्हणजे कोल्हटकरांना निदान ४००० प्रयोगाचा जास्त अनुभव गाठीशी आहे.

   * सध्या मराठी रंगभूमीला चांगले दिवस आले आहेत अशी चर्चा आहे. याबद्द्ल तुम्हाला काय वाटतं?

   - नाटकाची संहिता चांगली असेल, त्यातली पात्रे जीव ओतून काम करत असतील तर नाटकाला कोठचेही दिवस चांगलेच असतात. जर एखाद्या प्रकारची नाटके चालतात असे वाटून अंधपणाने तशीच नाटके आणली गेली तर कशी चालणार? नाटकात वेगळेपण हवे. सुजाण प्रेक्षकाला काय आवडेल हा विचार हवा. नाणं खणखणीत असेल तर बाजारात चालणारच.

   * मुळात तुम्ही नृत्य कलाकार आहात, मग नाट्य लेखनाकडे कशा वळल्या?

   - अपघाताने. ‘सुंदरा मनामध्ये भरली’च्या शंभराव्या प्रयोगाच्या निमित्ताने काढलेल्या स्मरणिकेतला प्रदीर्घ लेख लोकप्रभेच्या संपादकांना आवडला. त्यांनी मला लोकप्रभेत लिहायला सांगितले. त्यामुळे आयुष्य़ात पहिल्यांदा लिहायला लागले. लेखन लोकांना आवडायला लागले. मला पत्र यायला लागली. आणि मला एक नवीन खेळणं सापडलं. मी सतत नाटके कार्यक्रम करत असते. त्याच्या संहितेसाठी मला इतरांवर अवलंबून राहायची गरज नव्हती. नाटुकली लिहीली. मग ‘साऊंड ऑफ म्युझिक’ ह्या सिनेमाचा मराठीत भावानुवाद केला. त्यातले संवाद लोकांना आवडले. यामुळे विश्वास येत गेला, हुरूप वाढला. २००४ साली प्रभाकर पणशीकरांची आमच्या घरी मुलाखत झाली होती. ती ऎकून अटलांटाच्या बीएमएम अधिवेशनाला त्यांना आणूया असा लोकांनी आग्रह धरला. अटलांटाच्या समितीला पणशीकरांचे गाजलेले ‘तो मी नव्हेच’ हे नाटक नको होते. त्यामुळे मी केवळ त्यांना अमेरिकेत आणण्यासाठी म्हणून थोडीशी अमेरिकन थीम असलेला ‘अवघा रंग’ नाटक लिहीलं. अटलांटाला ते नाटक होऊ शकलं नाही. पण पणशीकरांना नाटकाची संहिता इतकी आवडली की, ते म्हणाले हे नाटक आपण भारतात करूया. आता त्या नाटकाचे ३५० च्यावर प्रयोग झाले आहेत. ‘अवघा रंग’नाटक कोल्हटकरांना आवडलं म्हणून त्यांनी मला या नाटकाची संकल्पना सांगितली. One thing led to other and here I am.

   * तुमच्या अभिनयाच्या अनुभवांबद्दल आम्हाला सांगा.

   - आजवर मी अमेरिकेत ‘वा-यावरची वरात’मधील कडवेकर मामी, ‘विच्छातली’ मैना, ‘सख्खे शेजारीत’ एक शेजारीण अशा मराठी नाटकात व ‘डॉक्टर तमे पण’ या गुजराथी नाटकात पारशी बाईची भूमिका केली आहे. ‘सूर माझे सोबती’मध्ये देखील मी भूमिका केली होती. तसेच अमरिश पुरीबरोबर ‘आधे अधुरे’ या हिंदी नाटकात मी बिन्नीची भूमिका केली होती. आम्ही त्या नाटकाचे अमेरिकाभर बारा प्रयोग केले. पुरीसाहेबांसारख्या बाप माणसाबरोबर एका रंगमंचावर असण्याचा अनुभव सगळ्यात आनंददायक होता. जी.एस.मेडिकल कॉलेजमध्ये मी गुजराथी नाटकात काम करायचे. इंटरकॉलेजिएटला मला गुजराथी नाटकांत व एकांकिकेत बक्षिसही मिळालेली आहेत. काही वर्षापूर्वी मी दोन इंग्लिश सिनेमात भूमिका केल्या आहेत. इतकी वर्षे रंगभूमीशी संबंधित असल्यामुळे एखादी भूमिका करण्याचे कधीच टेन्शन येत नाही. उलट करायला फार आवडते. पण इतरांना दिग्दर्शन करण्याच्या नादात स्वत:ला बाजूला ठेवले जाते. मी सध्या ABC channel वरील One Life To Live या सोप ऑपेरा मिसेस पटेल ही भूमिका करत आहे.

   * भारतात तुम्ही १५ वर्षांपूर्वी ‘सुंदरा मनामध्ये भरली’ नाटक केलं होतं, त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता, त्या नाटकाबद्द्ल काय सांगाल?

   - तोही एक गोड अपघात होता. मी मुळात डान्सर. अमेरिकेत आल्यावर Choreographer झाले. त्यातूनच ‘सुंदरा मनामध्ये भरली’ हे नाटक घडले. त्यात सतरा नाच होते. ते नाटक जेव्हा आम्ही शिकागो मंडळाच्या २५ व्या वर्धापन दिनाला केले. तेव्हा या वर्धापन दिनाचे मुख्य अतिथी लोकसत्ताचे संपादक माधव गडकरी अत्यंत खुष झाले व त्यांनी आमचे नाटक भारतात करायचा आग्रह धरला. केवळ त्यांच्या आग्रहाखातर आम्ही सुंदरा भारतात घेऊन गेलो. तेव्हा फक्त आठ प्रयोग आयोजित केले होते. लोकाग्रहास्तव नऊवा प्रयोग लावला. त्याआधी महाराष्ट्रात लावणीवर कधीही पूर्ण नाटक झाले नव्हते. तसेच सुंदरामधल्या लावण्यांचे सादरीकरण सालस होते. उत्तान नव्हते. त्यामुळे समीक्षक व रसिकांनी ते नाटक डोक्यावर घेतले. सगळ्या वयाचे प्रेक्षक सुंदरा पहायला यायचे. कितीतरी आजीबाईचे आशीर्वाद मला त्या नाटकामुळे मिळाले. त्या म्हणायच्या "पोरी(त्यांच्या मानाने त्यावेळेला मी पोरगीच होते) आमच्या घरचे पुरूष आमच्या लहानपणी तमाशाला जायचे. तुझ्यामुळे आम्ही पहिल्यांदा तमाशा पाहिला. नाहीतर ती इच्छा अपुरी राहिली असती. "आठ प्रयोग अत्यंत आनंदात, समाधानात आम्ही हौशी कलाकार परत येणार होतो. पण शेवटी प्रयोगाला मोहन वाघ आले. आणि त्यांनी आम्हाला व्यावसायिक रंगभूमीवर सुंदरा करायची ऑफर दिली. ख्रिसमसच्या सुटीत आम्ही भारतात जायचो व प्रयोग करून असीम आनंदात तरंगत परत यायचो. उरलेले अकरा महिने त्या आनंदात घालवायचो व परत जायचो. सुंदराचे प्रयोग असायचे तेव्हा महाराष्ट्रातली बाकीची नाटके थंड पडायची. त्यामुळे आम्ही कधी जातो याची वाट ते पहात असायचे. आपण ज्या कलाकारांचे आयुष्यभर कौतुक केलंय त्यांच्याकडून आपले कौतुक होणे हयात किती आनंद असेल ह्याचा विचार करा ना. सुंदराचा चार वर्षाचा कालखंद was the best period of my life.

   * या नाटकानंतर भारतात आणखी काही प्रयोग केलेत का?

   - इतर नाट्यसंस्थेव्दारे नंतरही सुंदराचेच खूप प्रयोग झाले. नंतर मी कुसुमाग्रजांच्या ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ या कवितेवर आधारित वसुंधरा या नृत्यनाटिकेचे प्रयोग केले. २००६ साली ‘आत्मन’ ही संस्था भारतात स्थापन करून त्याव्दारे मी सुंदराचे व मी लिहीलेल्या ‘वग वॉशिंन्टनचा’ ह्या नाटकाचे प्रयोग केले.

   * नवीन कलाकारांना, दिग्दर्शकांना आणि लेखकांना काय सांगाल?

   - प्रेक्षक आहेत म्हणून आपण आहोत. प्रेक्षकांना आपण कसे खिळवून धरू शकू असा विचार केला की आपोआप सगळं सुचत जातं.

   * नवीन कुठला प्रोजेक्ट्स करत आहात?

   - मागच्या वर्षी मी डॉ.आनंदी जोशी हिच्या अमेरिकेतील आयुष्यावर एक दीर्घांक केला होता. तो भारतात करण्यासाठी काही लोक उत्सुक आहेत. तसेच Sound of Music वरचं नाटक भारतात करण्याचे चाललंय. हल्लीच मला भारतातून एक फार मोठं इंटरेस्टिंग प्रोजेक्ट्स मिळालेले आहे. वेळ आली किंवा सगळं व्यवस्थित मनासारखं झालं की त्याविषयी कळेलच.

   नृत्य, अभिनय, लेखन आणि दिग्दर्शन अशा बहुरंगी व्यक्तीमत्वाच्या व्यक्तींनी आपल्या वेगळ्या कामातून नेहमीच आपलं वेगळेपण जपलंय. कितीही सिनिअर झालेतरी काहीतरी वेगळं करण्याचा त्यांचा प्रयत्न चालूच असतो. डॉ.मीना नेरूरकरही त्यातीलच एक म्हणता येतील. पु.लं. देशपांडेच्या लेखांवर आधारीत पहिल्यांदाच होणा-या या प्रयोगासाठी प्रेक्षकही अतिशय उत्सुक असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे कार्यक्रमांबाबत जाणून घेण्याची आमचीही उत्सुकता शिगेला पोहचली होती. त्यासाठी मीना नेरूरकर यांच्याशी झगमग टीमने संवाद साधला आणि त्यांनीही मनमोकळेपणाने उत्तरे दिली. शेवटी या प्रयोगासाठी झगमग टीमकडून त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचा निरोप घेतला....


Other Interview link


AddThis Social Bookmark Button
 

Add comment