सामाजिक भान असलेला वकील - उदय वारूंजीकार
सामाजिक भान असलेला वकील - उदय वारूंजीकार

मुंबई हायकोर्टात गेली पंधरा वर्षे सामान्य माणसालाही न्याय मिळवून देणारे तरूण व तडफदार ऍड. उदय वारूंजीकर बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ऍंड गोवा या संघटनेची निवडणूक लढवित आहेत. आजवर जनहित याचिकांच्या माध्यमातून अमाप प्रसिध्दी लाभलेल्या ऍड. वारूंजीकर यांना संघटनेच्या कार्यासाठी निवडून देण्याचे वकील बांधवांना याद्वारे आवाहन करीत आहोत.

-संपादक

 जनहित याचिकांद्वारे सामाजिक बांधिलकी जपणारा वकील - ऍड. उदय वारूंजीकर

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्राची निवडणूक लवकरच होणार आहे. बार कौन्सिल ही एक वकीलांची प्रतिष्ठित व मान्यताप्राप्त संघटना असून ती समाजासाठी विशेषत: वकील वर्गाच्या व न्यायव्यवस्थेच्या भल्यासाठी काम करीत असते.अशा या प्रतिष्ठित संघटनेच्या निवडणुकीत मोठी चढाओढ असते. यामध्ये प्रत्येक मान्यवर वकील भाग घेत असतात. त्यामुळे या निवडणूकीला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झालेले आहे. तेव्हा या महत्त्वाच्या निवडणूकीसाठी जे उमेदवार उभे राहणार असतील त्यांच्याबाबत सर्वच मतदार वकीलांनी समंजसपणे विचार करण्याची गरज आहे. महाराष्ट्र बार कौन्सिलच्या निवडणूकीत वकीलांनी मतदान करतानाज्या उमेदवाराला मत द्यायचे आहे त्याबात काही निकष लावणे आवश्यक आहे.

या महत्त्वाच्या निवडणुकीसाठी जे वकील म्हणून उभे राहणार आहेत किंवा जे इच्छूक आहेत त्यांच्याजवळ काही गुण असणे निश्चिततच गरजेचे आहे. आता, वकील संघटना म्हटल्यावर सर्वच उमेदवार वकील असणारच. परंतु वकीलीची नुसतीच पदवी असण्यापेक्षा अशा उमेदवाराजवळ एल.एल.एम. सारखी उच्च पदवी असावी. याचाच अर्थ असा की, अशा उमेदवाराला सतत शैक्षणिक गुणवत्ता वाढीची जिज्ञासा आहे. त्यामुळे अशा एल.एल.एम. झालेल्या उमेदवाराला वकीलीतील शैक्षणिक ज्ञान इतर वकीलांपेक्षा अधिक खोलवर असते.

उच्च शैक्षणिक पात्रतेबरोबर अशा उमेदवाराकडे इतरही काही गुण असणे आवश्यक आहे. बार कौन्सिलच्या पदाधिकार्‍यांकडे सामाजिक दृष्टी असणे गरजेचे आहे. कारण बार कौन्सिल ही जरी वकीलांची संघटना असली तरी तिच्या कामाचा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर परिणाम होत असतो. त्यामुळे बार कौन्सिलच्या बहूतेक सर्व कामांचा, निर्णयांचा परिणाम पक्षकारांवर होणारा असतो. त्यामुळे बार कौन्सिलच्या पदाधिकार्‍याच्या सामाजिक जाणीवा किती प्रगल्भ आहेत यावर पक्षकारांचे म्हणजेच पर्यायाने समाजाचे हित अवलंबून असते.

सामाजिक जाणिवेबरोबरच अशा उमेदवाराकडे व्यवसायिक प्रामाणिकपणा असणे ही फार महत्त्वाचीच बाब आहे. कायद्यमध्ये वकीलांच्या वर्तणुकीविषयी किंवा नितीमत्तेविषयी सविस्तर तर्तूद असूनसुध्दा व्यवहारामध्ये त्याचे आचरण करणार्‍या वकीलांची संख्या फार मोठी नसावी. आपल्या वकीलाच्या पक्षकारांच्या अगदी साध्यासुध्या अपेक्षा असतात. आपल्या वकीलाने आपली बाजू प्रामाणिकपणे कोर्टात मांडावी, योग्य फी घ्यावी, खटल्याचा निकाल लवकरात लागावा यासाठी पुढाकार घ्यावा, खटल्याच्या तारखा, त्यातील टप्पे यांची वकीलांनी वेळोवेळी माहिती द्यावी, विरूध्द पक्षाच्या भ्रष्टाचाराला साथ देऊ नये अशा प्राथमिक; पण महत्त्वच्या गोष्टी वकीलांकडून अपेक्षित असतात.तेव्हा पक्षकाराच्या हितासाठी वागणारी वकील हा बार कौन्सिलच्या पदाधिकारी असावी. त्यामुळे इतर सर्व वकीलांसमोर एक चांगला आदर्श निर्माण होऊ शकतो.

त्यानंतरचा महत्त्वाचा गुण म्हणजे समाजात विशेषत: न्यायव्यवस्थेत चालणार्‍या अन्यायविरोधात चीड असणारा पदाधिकारी हा बार कौन्सिलमध्ये असणे गरजेचे आहे. न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचाराला पाठीशी न घालता त्याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न करण्याची प्रमुख जबाबदारी बार कौन्सिलच्या पदाधिकार्‍यावर असते.

आपला व्यवसाय सांभाळून बार कौन्सिलच्या कामासाठी स्वत: वेळ देणारा उमेदवार निवदून देणेचा विचार मतदार वकीलांनी करण्याची गरज आहे अनेकवेळा बार कौन्सिलच्या निवडणुकीत उच्च शैक्षणिक पात्रता असलेला व आपल्या वकीली व्यवसायात निष्णात व पारंगत असलेला वकील निवडून येतो; परंतु एकदा पदाधिकारी झाल्यानंतर बार कौन्सिलच्या कामासाठी वेळ काढणे अशा वकीलांना जमत नाही किंवा त्यांच्या स्वभावामुळे ते काढत नाहीत. त्यामुळे बार कौन्सिलचा उमेदवार हा नुसताच हुशार, अभ्यासू, निष्णात असून उपयोगी नाही; तर त्याच्या या गुणांचा संघटनेच्या व न्यायव्यवस्थेच्या भल्यासाठी उपयोग करणारा वकील निवडून येणे आवश्यक आहे.

बार कौन्सिलसाठी उभा राहणारा वकील हा निस्पृह असणे गरजेचे आहे. अनेकवेळा बार कौन्सिलला काही कठोर निर्णय घेण्याची वेळ येते अशावेळी काही वकील दुखावले जाण्याची शक्यता असते किंवा त्या निर्णयाचा त्रास आपल्या वकीले मित्रास होण्याची शक्यता असते. परंतु अशावेळी भावनेच्या आहारी न जाता, संघटनेच्या व विशेषत: न्यायव्यवस्थेच्या भल्याचा निर्णय घेणे, बार कौन्सिलच्या अशा पदाधिकार्‍यावर गरजेचे आहे.

बार कौन्सिल ऑफ महारष्ट्राच्या आगामी निवडणुकीसाठी ऍड.उदय वारूंजीकर हे जेष्ठ वकील उभे राहणार आहेत. किंबहुना अनेक वकीलमित्रांनी त्यांना या निवडणुकीत उभे राहण्याची गळ घातली आहे. फक्त मुंबई हायकोर्टातील वकीलच नव्हे, सांगली, सातारा, पुणे, सिंधुदुर्ग, सोलापूर अशा दुरदुरच्या ठिकाणी कार्यरत असाणार्‍या अनेक वकीलांची ऍड.उदय वारूंजीकर यांनी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्राच्या निवडणुकीला उभे राहावे अशी तीव्र इच्छा आहे.

आमच्या राष्ट्रीय ग्राहक संघटनेच्या माध्यमातून ऍड. वारूंजीकरांचा व आमचा गेल्या ८-१० वर्षापासून परिचय आहे. आमच्या ग्राहक संघटनेच्या व इतर सामाजिक खटल्यांमध्ये ऍड. उदय वारूंजीकरांनी यशस्वीपणे काम केले आहे. मुळात आमच्यासारख्यासामाजिक संघटनांची सामाजिक स्थिती उच्च असली तरी आर्थिक परिस्थिती मात्र बताचीच असते. अर्थात सामाजिक संस्था आर्थिकदृष्ट्या श्रीमंत नसाव्यातच असे मला वाटते.त्यामुळे अशा संघटनांकडे काही आर्थिक लाभाच्या आशेने आकर्षित होणार्‍यांची संख्या आपोआपच कमी होते. त्यामुळे अशा सामाजिक संघटनांना किंवा सामाजिक कार्यकर्त्यांना एखाद्या हुशार, अभ्यासू; परंतु कमी पैशात काम करणार्‍या वकीलाची गरज असते. ऍड. उदय वारूंजीकरांकडे याच नजरेने बघणार्‍यांची संख्या मोठी आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या व अत्यंत महत्त्वाच्या अशा ध्वनी प्रदूषण विरोधातील जनहित याचिका आमच्या राष्ट्रीय ग्राहक संघटना व इतर चार सामाजिक संघटनांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ऍड. उदय वारूंजीकरांनी ही जनहित याचिका यशस्वीपणे चालवली असे नव्हे; तर त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा पोलिस ठाण्याकडे ध्वनीप्रदूषणमापक यंत्रे पुरवठा करणे शासनाला बंधनकारक झाले. या याचिकेसाठी आम्ही ऍड. वारूंजीकरांना फक्त न्यायालयीन खर्चाचे पैसे देऊ शकलो; परंतु सामाजिक हिताच्या कामापोटी त्यांनी हे आनंदाने मान्य केले! यातूनच त्यांना सामाजिक बांधिलकीची जाण असल्याचे दिसून येते.

शाळा प्रवेशाचा प्रश्न असेल, गर्भलिंगचाचणी संदर्भातील केसेस असतील किंवा एखाद्या विद्यार्थ्याच्या कॉलेजच्या प्रवेशातील अन्यायाविरोधातील याचिका असोत. अशा अनेक जनहित याचिकांमध्ये ऍश. उदय वारूंजीकरंनी अभ्यासूपणे बाजू मांडून उच्च न्यायालयाकडून अनेक महत्वाचे निकाल मिळवले आहेत. या याचिकांमध्ये विविध शासकीय कायद्यांचा, नियमांचा खोलवर अभ्यास करून बाजू मांडणे आवश्यक होते. ऍड.उदय वारूंजीकर यासाठी निश्चित पात्र आहेत असे वाटते.

वक्तशीरपणा व पक्षकार, सहकार्यांशी संपर्क ठेवण्याची कलाही त्यांनी यशस्वीपणे जोपासली आहे. आमच्या गेल्या दहा वर्षातील अनुभवानुसार ऍड.उदय वारूंजीकर हे पक्षकारांशी व्यवस्थित संपर्क ठेवतात, वेळच्यावेळी त्यांना न्यायलयीन केसेसमधील विविध टप्प्यांची माहिती कळवतात. सांगली, कोल्हापूरसारख्या दूरच्या ठिकाणांवरून मुंबई उच्च न्यायालयीन कामासाठी पक्षकारांना कमीतकमी वेळा येण्यासाठी प्रयत्न करतात.

ऍड. उदय वारूंजीकरांच्याकडे आणखी एक चांगला व महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांची वकीली व्यवसायाविषयी व विशेषत: पक्षकाराविषयी असलेला प्रामाणिकपणा हा होय. ऍड. वारूंजीकरांवर केस सोपवली म्हटल्यावर आपला वकील विरूध्द पक्षाला मिळणार नाही, आर्थिक आमिषाला बळी पडणार नाही याची त्यांच्या पक्षकारांना खात्री असते. बार कौन्सिलच्या उमेदवाराकडे हा गुण असणे अत्यंत गरजेचे वाटते.

त्यामुळे बार कौन्सिलचा पदाधिकारी हा उच्च शैक्षणिक पात्रता असलेला, व्यवसायाशी प्रामाणिक, अभ्यासू, सतत नाविण्याचा शोध घेणार, सामाजिक जाणीवा प्रगल्भ, प्रसंगी स्वत:च्या खिशाला कात्री लागली तरी आपली व्यावसायिक जबाबदारी पार पाडणारा असणे आवश्यक आहे. आणि ऍड. उदय वारूंजीकर ते बार कौन्सिलवर निवडून आल्यास त्यांच्या कामाचा बार कौन्सिलला निश्चितच मोठा फायदा होईल याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही.

- ऍड. अनिल ताडे, सांगली

आवाहन

२२ जून १९९४ रोजी वकीली करण्याची सनद मला मिळाली. काळा कोट घालून वकीलपत्र दाखल करण्याची परवानगी
मिळाली. होता, होता सुमारे ६,३०० पेक्षा जास्त प्रकरणे हाताळण्याची  संधी मिळाली.

या प्रवासामध्ये प्रामुख्याने जाणवलेली गोष्ट म्हणजे वकील वर्ग हा एक बुध्दीजीवी वर्ग असून संघटीत झालेला नाही. आपल्या अधिकारासाठी संघर्ष करायला तयार नाही. पक्षकारासाठी न्यायिक लढा देताना आपण स्वत:साठी लढाई करायचे विसरून गेलो आहोत.

दुसरीकडे न्यायपालिका आणि कायदेमंडळामार्फत  वकील वर्गाची गळचेपी चालली आहे. न्यायव्यवस्थेकडूनच नव्हे तर अन्य सर्व घटकांकडून वकीलांकडे दुर्लक्ष होत आहे.

सामान्य पक्षकार हा केंद्रस्थानी असतोआणि त्याच्याभोवताली संपूर्ण न्यायव्यवस्था असते. हा झाला मूळ सिध्दांत.
परंतु पक्षकारासाठी न्याय की न्यायालयासाठी पक्षकार अशी परिस्थिती झाली आहे.

कोर्ट फीची भरमसाठ वाढ झाली आहे ही सत्यपरिस्थिती आहे.त्याचा परिणाम म्हणून ग्रामीण भागातील पक्षकारांना न्यायालयाची पायरी चढण्यापूर्वी विचार करणे भाग पडले आहे. रास्त आणि योग्य बाजू जरी असली तरी न्यायालयीन खर्च झेपणे ही आवाक्याबाहेरची गोष्ट झाली आहे.

वकील हा न्याय संस्थेमधील न्यायमूर्ती आणि सामान्य पक्षकार या मधील महत्त्वाचा दुवा आहे. वकीलने पक्षकाराचा प्रवक्ता असू नये तर तो न्यायालयीन अधिकारी असतो असे म्हटले जाते. मात्र या वकीलसाठी न्याय व्यवस्थेमध्ये फारशी जागा आता शिल्लक उरलेली नाही.

वकीलांना वगळून तडजोड करण्याचे प्रयत्न न्यायालयाकडून होतात. प्रकरणे लवकर निकाली निघावी म्हणून वकीलांना वगळणे म्हणजे आग रामेश्वरी  आणि बंब सोमेश्वरी असेच उदाहरण आहे. विधीमंडळामध्ये अनेक सदस्य वकीलीची पदवी घेतलेले असले तरी याच विधीमंडळामध्ये वकील न्यायालयामध्ये नको अशी भूमिका घेऊन कायदे पारीत केले जात आहेत. न्यायालय स्थापनेसाठी जे अनेक निकष आहेत त्यामध्ये वकीलांसाठी वेगळी खोली असावी असा निकष मात्र दिसून येत नाही. त्यामुळे न्यायालय आवारामध्ये वकीलांची खोली ही दुर्लक्षित झाली आहे. त्या खोलीमधील व्यवस्था, फर्निचर आणि अशा अनेक प्रश्नांचे प्रश्न या वकील वर्गाच्या खोलीबाबत उभे राहिले आहेत.

पुरेश्या खुर्च्या, टेबले, कपाटे, लॉकर्स नसणे, लाईट नसणे, पाणी नसणे, विशेष करून महिला वकीलांसाठी स्वतंत्र व्यवस्था पुरेशी नसणे, सामान्य पक्षकारा चहा-पाणी, नाष्टासाठी स्वतंत्र व्यवस्था नसणे, वकीलांसाठी जेवणाची सोय नसणे. महिला पक्षकार तसेच वकीलांसाठी स्वतंत्र स्वच्छ अशी स्वच्छतागृहे नसणे. वीज गेल्यावर जनरेटरची तसेच इन्व्हर्टरची व्यवस्था नसणे. अशा अनेक सत्यकथा सांगता येतील.

पण वकील वर्गाची खोली ही सामान्य पक्षकाराने आपल्या वकीलाला प्रकरणाची माहिती देण्यासाठी आणि वकीलांनी पक्षकाराचे काम करण्यासाठी याच खोलीचा वापर करत असल्याने न्यायालयाने इमारतीचा अविभाज्य घटक म्हणून वकीलांच्या खोलीला मान्यता मिळाली पाहिजे.

वकीलवर्गासाठी आज उपलब्ध असलेल्या सोई-सुविधा हा एक विषय आहे. तर वकीलांना सुरूवातीची काही वर्षे पाठ्यवृत्ती द्यावे हा एक वेगळा विषय आहे. सुरूवातीच्या काही वर्षांमध्ये वकीलांना प्रोत्साहन देणे ही योजना चालू झाली पाहिजे.

डॉक्टरांना पाठ्यवृती मिळते, मग वकीलांना का नाही? वकीलांना सनद मिळाल्यावर देखील शिकविण्याची गरज असते. मग वकीलांसाठी या सुविधा का नाही ?

  वैद्यकीय व्यावसायिक हा अत्यावश्यक सेवेमध्ये धरला जातो. मात्र वकीलांना अत्यावश्यक सेवा धरले जात नाहीत. असे अनेक प्रश्न या विधीव्यवसायाबद्दलुभे आहेत. मात्र या प्रश्नांना सामोरे जाण्याची तयारी आपल्या सर्व विधी व्यावसायिकांची झालेली दिसत नाही.

न्यायालयीन व्यवस्था आणि वकीलांची दूरवस्था यावर भाष्य करणे हे सोपे आहे.पण ही व्यवस्था बदलण्यासाठी पाय रोवून उभे राहणे हीच खरी काळाची गरज आहे.

  किनार्‍यावर उभे राहून प्रवाहाबद्दल टीका-टिप्पणी करण्यापेक्षा प्रवाह निर्माण करणे, बदलणे हे गरजेचे झाले आहे. मी गेल्या अनेक वर्षांमध्ये नित्य नेमाने वकील म्हणून पक्षकाराप्रती असणारे कर्तव्य पार पाडीत आलो आहे. पण आता मात्र स्वत:पुढे येणे अत्यावश्यक झाले आहे.

म्हणूनच.....

म्हणूनच, मी ठरवले की बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या निवडणुकीसाठी उभे राहणार . आपल्या वकील वर्गासाठी माझा खारीचा वाटा देण्यासाठी मी ही निवडणूक लढणार आहे. व्यवस्था भ्रष्ट झाली आहे असे म्हणून मी स्वस्थ बसणार नाही.

  आपल्या सहकार्याच्या अपेक्षेत....


                                                                    आपलाच,
                                                               उदय प्रकाश वारूंजीकर  
AddThis Social Bookmark Button